८० च्या दशकामध्ये आतासारखे केबल, डिश टीव्ही हे प्रकार नव्हते. त्याकाळी केवळ दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच वाहिन्या होत्या. त्यामुळे त्याकाळी प्रेक्षकांचं मनोरंजनाचं साधन म्हणजे या दोन वाहिन्याच. या वाहिन्यांनी त्यावेळी ‘महाभारत’ आणि ‘रामायण’सारख्या पौराणिक कथा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. या मालिकांपैकी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका बरीच गाजली. मालिकेत अरुण गोविल, सुनील लहरी, दीपिका चिखालिया, अरविंद त्रिवेदी, दारा सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. विशेष म्हणजे या मालिकेतील सीता हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ही भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. आज इतक्या वर्षानंतर दीपिका कुठे आहेत, काय करतायेत किंवा कशा दिसतात असा प्रश्न बऱ्याचदा चाहत्यांच्या मनात डोकावत असेल.
सध्या जगभरात करोना विषाणूचं सावट असल्यामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे घरात असलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळेच सध्या दीपिका चिखलिया यांची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी दिपिका यांनी रामायणात काम केलं होतं. या मालिकेतनंतर त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी अन्य काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्यानंतर त्यांनी कलाविश्वापासून फारकत घेतली. जवळपास २३ वर्ष कलाविश्वापासून दूर राहिलेल्या दीपिका यांनी २०१८ मध्ये ‘गालिब’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. या चित्रपटात त्यांनी दहशतवादी अफजल गुरुच्या आईची व्यक्तीरेखा साकारली होती.
दरम्यान, दीपिका कलाविश्वापासून दूर असल्या तरीदेखील सोशल मीडियावर त्यांचा चांगलाच वावर असल्याचं पाहायला मिळतं. इन्स्टाग्रामवर त्या सक्रीय असून बऱ्याच वेळा ते कुटुंबासोबतचे, मित्रमैत्रिणींसोबतचे फोटो शेअर करत असतात. विशेष म्हणजे या वयातही त्या तितक्याच ग्लॅमरस दिसतात.