‘दगडी चाळ’ हा चित्रपट मुंबई अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड अरुण गवळी याच्यावर आणि १९९० च्या काळातील मुंबईतील टोळीयुद्धाच्या पाश्र्वभूमीवरचा आहे हे चित्रपटगृहात जाण्याआधीपासूनच प्रेक्षकांना माहीत आहे; किंबहुना चित्रपटाच्या शीर्षकामुळेच प्रेक्षक चित्रपटगृहात उत्सुकतेने जातील याची काळजी चित्रपटकर्त्यांनी पुरेपूर घेतली आहे हेच या शीर्षकावरून सूचित केले आहे. मात्र डॅडी ऊर्फ अरुण गवळी याच्यावरील चरित्रपट नाही, तर एक सर्वसामान्य तरुण काही घटनांमुळे डॅडी आणि दगडी चाळीच्या विरोधात कसा जातो आणि नंतर डॅडीचाच माणूस कसा बनत जातो याची कथा रुपेरी पडद्यावर रंजक पद्धतीने उलगडली आहे.

सूर्यकांत शिंदे ऊर्फ सूर्या हा चाळीत राहणारा तरुण चाळीजवळच्याच वाहनदुरुस्तीच्या गॅरेजमध्ये नोकरी करतोय. त्याच्याच चाळीत नव्याने राहायला आलेल्या सोनलवर त्याचे प्रेम आहे. सूर्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्याच्या गॅरेजमध्ये तो सोनलसह तिचा वाढदिवस साजरा करीत असताना दुरुस्तीसाठी वाहन घेऊन काही आडदांड तरुण येतात. ते सोनलला पाहून काही शेरेबाजी करतात आणि त्यावरून सूर्या आणि त्या आडदांड तरुणांमध्ये हाणामारी होते. नंतर हे तरुण दगडी चाळीशी संबंधित असल्याचे समजते आणि हे प्रकरण चिघळत जाते. सूर्या एकामागून एक गुन्हय़ांमध्ये अडकत जातो. त्यातून सुटण्यासाठी एका इसमाच्या मदतीने तो डॅडीला जाऊन भेटतो. वैमनस्य संपविण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी करतो. यातून मार्ग म्हणून डॅडी सूर्याला त्याच्यासाठी खंडणीवसुलीचे एक प्रकरण हाताळायला सांगतो.

सूर्याला पकडून त्याचा वापर करून डॅडीला पोलिसांच्या जाळ्यात अडकविण्यासाठी पोलीस अधिकारी ए. ए. खान कट रचतात. त्यांच्या या कटाचा सुगावा लागल्याने डॅडीसाठी काम करणारा पोलीस अधिकारी काळे हा सूर्याला अटक करण्याचा प्रयत्न करतो. नंतर डॅडी आणि पोलीस यंत्रणा यांच्या जाळ्यात काळे अडकतो.

चित्रपटाचे कथानक सूर्याच्या अटकेनंतर फ्लॅशबॅकद्वारे दाखविण्यात आले आहे. एक सर्वसामान्य तरुण एका घटनेमुळे कसा डॅडीच्या टोळीत समाविष्ट होतो, नकळतपणे गुन्हेगार बनतो याची गोष्ट सूर्याच्याच नजरेतून दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना दाखवली आहे. त्यामुळे सूर्या या भूमिकेला प्रेक्षकांची आपोआपच सहानुभूती मिळते. त्याचप्रमाणे सूर्याच्या नजरेतून चित्रपट दाखविताना डॅडी किंवा गुन्हेगारी जगताची बाजू उचलून न धरण्याचा प्रयत्नही लेखक-दिग्दर्शकांनी चांगल्या प्रकारे केला आहे. गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडविणारे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. मात्र कुणाचीच बाजू न घेता, डॅडी हा डॉन किंवा डॅडीची टोळी या कुणाचेच उदात्तीकरण करण्याचे लेखक-दिग्दर्शकांनी खुबीने टाळले आहे आणि तरीही उत्कंठावर्धक अ‍ॅक्शनपट बनवून प्रेक्षकांची करमणूक करण्यात निश्चित यशस्वी झाले आहेत ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

मकरंद देशपांडेने डॅडी ही भूमिका साकारली आहे. सूर्या या भूमिकेद्वारे अंकुश चौधरीने उत्तम नायक साकारला आहे आणि हेच या चित्रपटाचे सामथ्र्य ठरले आहे. चंदू मामा या व्यक्तिरेखेद्वारे संजय खापरे यांनीही चांगल्या प्रकारे भूमिका साकारली आहे. कमलेश सावंत यांनी भ्रष्ट पोलीस अधिकारी काळे ही भूमिका आणि त्यांचा पडद्यावरचा वावर प्रेक्षकांच्या लक्षात राहील असा साकारला आहे. सोनलच्या भूमिकेतील पूजा सावंत आणि सूर्याच्या भूमिकेतील अंकुश चौधरी यांची जोडी प्रेक्षकांना आवडू शकेल.

खटकणाऱ्या गोष्टींमध्ये गुंडाशी लढताना शहीद झालेल्या सूर्याच्या वडिलांचे अंत्यविधी होत असताना पोलीस अधिकाऱ्यांपैकी कुणीही उपस्थित नसणे, तसेच डॅडीच्या गुंडांनी अंत्यविधी सुरू असताना हल्ला करणे याचा समावेश करता येईल. मात्र एकंदरीत चित्रपट सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो.

 

दगडी चाळ

निर्माते – मंगलमूर्ती फिल्म्स, साई पूजा एण्टरटेन्मेंट अ‍ॅण्ड फिल्म

दिग्दर्शक – चंद्रकांत कणसे

कथा – नरेश परदेशी, सुरेश सावंत

पटकथा – चंद्रकांत कणसे, आदेश अर्जुन

संवाद – अजय ताम्हाणे, प्रवीण कांबळे

संगीत – अमितराज

कलावंत – अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत, संजय खापरे, कमलेश सावंत, यतीन कार्येकर

सुनील नांदगावकर – sunil.nandgaokar@expressindia.com