रेश्मा राईकवार

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे भाऊ कदम. विनोदाचा हुकमी एक्का ठरलेले अभिनेते भाऊ कदम या आठवडय़ात ‘पांडू’ हवालदाराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. बहुरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातील गाजलेली ही व्यक्तिरेखा भाऊंनी साकारली आहे. नव्या पिढीला दादांची, त्यांच्या चित्रपटांची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘पांडू’, असं भाऊ सांगतात.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांनी आपली ओळख निर्माण केली आहे हे खरं आहे, पण अचानक दादांच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन ‘पांडू’ चित्रपट त्यांना का करावासा वाटला, असा प्रश्न पडतो. यामागे कोणतीही एक अशी प्रेरणा नाही तर अनेक गोष्टी आहेत, असं भाऊ म्हणतात. दादा ज्या पद्धतीने विनोदी भूमिका करत होते, त्याच पद्धतीने मी करतो. त्यांचं काम मी करू शकेन, असं मी कित्येक वेळा अनेकांकडून ऐकत आलो आहे. काही र्वष आधी चित्रीकरण सुरू असताना तिथे असलेल्या ज्येष्ठ छायाचित्रकारानेही मला स्वत: येऊन तुम्ही दादांचा चित्रपट करा, अशी विनंती केली होती. द्वयर्थी संवाद ही दादांची खासियत होती. निखळ मनोरंजन करणारे त्यांचे जुने चित्रपट हल्ली कुठेच पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे किमान आपल्याकडून चित्रपटाच्या माध्यमातून दादांची ओळख नव्या पिढीला होईल आणि जुन्या पिढीच्या मनातील दादांच्या आठवणी जागी होतील, या विचारातून  ‘पांडू’च्या निर्मितीचा घाट घातला गेला, असं भाऊ सांगतात. ‘पांडू’ हवालदारच का? तर त्यासाठी भाऊ आणि कुशल ब्रद्रिके यांचे हवालदाराच्या वेशातील छायाचित्र त्याला कारणीभूत ठरल्याचेही ते सांगतात.

ये दोस्ती..

मी, कुशल आणि चित्रपटाचा दिग्दर्शक विजू माने आम्ही तिघेही खास मित्र.., असं सांगत भाऊ पुन्हा एकदा ‘पांडू’ची जन्मकथा सांगण्यात रमतात. गेले सात र्वष मी आणि कुशल ‘चला हवा येऊ द्या’मधून काम करतो आहोत, लोकांसमोर येतो आहोत, विनोदी भूमिका आम्ही सातत्याने करतो आहोत, मात्र त्यातून बाहेर पडून काही तरी वेगळं करावं, अशी आमच्या दोघांचीही इच्छा होती. एकदा याच कार्यक्रमाच्या सेटवर हवालदाराच्या वेशात आम्ही दोघे चित्रीकरण करत होतो. मधल्या वेळात आम्ही बाहेर आलो आणि दुचाकीवर बसून आमची या वेशातील काही छायाचित्रं आम्ही काढली आणि ती विजूला पाठवली. यावरून काही करता येईल का, असं आम्ही त्याला विचारलं होतं. तेव्हा त्याला ‘पांडू हवालदार’ची कल्पना सुचली, असं त्यांनी सांगितलं. मराठी चित्रपटांमध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जशी जोडी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय झाली, तशी नंतर कोणाचीच झाली नाही. मी आणि कुशल त्या दोघांप्रमाणे पडद्यावर जोडीने धमाल उडवून देऊ शकतो, असं विजूला वाटलं आणि त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रयत्न केला, असं ते म्हणतात. अर्थात, अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती हे एक आव्हान असतं. कोणी पैसे लावायला सहसा तयार होत नाही, ‘झी स्टुडिओ’ने या चित्रपटावर विश्वास दाखवल्याने ते शक्य झालं, अशी भावनाही भाऊंनी व्यक्त केली.

भ्रम तुटेल..

‘पांडू’ करताना आणखी एक आव्हान होतं ते म्हणजे टीव्हीवरचे कलाकार चित्रपटात लोकप्रिय होऊ शकत नाहीत, हा समज आजही प्रचलित आहे. त्यामुळे आम्हाला घेऊन कोणीच चित्रपट करत नाहीत, अशी खंत भाऊंनी व्यक्त केली. मराठीतही बरेच जण टीव्ही कलाकार आणि चित्रपटातील कलाकार यात अजूनही भेदभाव करतात. हे दररोज ‘चला हवा येऊ द्या’मधून लोकांसमोर येतात म्हटल्यावर त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात का येतील? असा प्रश्न केला जातो. ‘पांडू’ या चित्रपटाने हा भ्रम दूर होईल, असा विश्वास भाऊंनी व्यक्त केला.

दादांची नक्कल नाही..

दादा कोंडके हे दिग्गज आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचा करिश्माच वेगळा आहे. दादांची नक्कल मी करू शकत नाही. खरं तर मला नक्कलच करता येत नाही, असं भाऊ सांगतात. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये मला शाहरूख खान, शाहीद कपूर अशा कोणाकोणाच्या भूमिका कराव्या लागतात. मला खरंच त्यांची नक्कल करायला जमत नाही, असं मी डॉ. नीलेश साबळेला सांगितलं होतं; पण आपण जे नाही आहोत ते दाखवणं, त्यांच्याप्रमाणे वागण्या- बोलण्याचा प्रयत्न करत राहणं यातच तर नट म्हणून खरी गंमत आहे, असं नीलेशने सांगितलं. ते आपल्याला पटलं, त्यामुळे ज्याची व्यक्तिरेखा करायची आहे त्याची नक्कल न करता आपल्या पद्धतीने त्या व्यक्तिरेखा साकारणं आपल्याला जास्त योग्य वाटतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ‘पांडू’मध्ये दादांची नक्कल केलेली नाही आणि हा चित्रपट ‘पांडू हवालदार’वर बेतलेलाही नाही. त्यातल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा या चित्रपटात आहेत, पण कथा पूर्णपणे वेगळी लिहिण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनाली कुलकर्णी आणि माझी जोडी हाही लोकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. सोनालीने आजवर कधी अशी भूमिका केलेली नाही. तिने पटकथा वाचली आणि तिची जी उषाची व्यक्तिरेखा आहे ती दणकट, मारामाऱ्या करणारी.. यात सोनालीला अ‍ॅक्शनला खूप वाव आहे, त्यामुळे तिनेही या भूमिकेला होकार दिला, असं त्यांनी सांगितलं.

‘पांडू’मुळे दादांचे चित्रपट पाहण्याचा ट्रेण्ड सुरू होईल, असं भाऊंना वाटतं. हा चित्रपट एकाच वेळी माझ्या आजोबांसारख्या जुन्या पिढीतील लोकांसाठी ज्यांनी दादांचे चित्रपट पाहिले आहेत, त्यांच्यासाठी स्मरणरंजन ठरणार आहे, तर दुसरीकडे नव्या पिढीला दादा कोंडके यांची ओळख होण्यासाठीही या चित्रपटाचा हातभार लागणार आहे, याचं समाधान वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या चित्रपटामुळे टीव्ही कलाकाराचा शिक्काही पुसला जाईल आणि रुपेरी पडद्यावर आणखी काही प्रयोगशील भूमिका करता येतील, असा विश्वासही भाऊ कदम यांना वाटतो आहे.