‘साला खडूस’मधील ‘मधी’ कल्याणकर
घरात मार्शल आर्टचे वातावरण असल्याने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ती कराटेचे धडे गिरवू लागली. कराटेपटू असलेल्या वडिलांच्याच तालमीत शिकत असल्याने ती अल्पावधीतच उत्तम कराटेपटू बनली. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धातून तिने चमकदार कामगिरीही केली. आणि याच कराटे कौशल्याने तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला! क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार, गैरप्रकार यांच्यावर भाष्य करतानाच गुरूशिष्याच्या वेगळ्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘साला खडूस’ या हिंदी आणि ‘इरुधी सुत्तरू’ या तमिळ चित्रपटातील अभिनयाबद्दल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या रितिका सिंगच्या कारकीर्दीला कराटे कौशल्यानेच वेगळ्या वळणावर नेले. ‘साला खडूस’मधील ‘मधी’ साकारणारी रितिका कल्याणची रहिवासी असल्याने या निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कारांवर या शहराचा ठसा उमटला आहे.
कल्याणच्या खडकपाडा परिसरातील संघवी स्टेटमध्ये मोहन सिंग हे कराटे प्रशिक्षक राहतात. एका खासगी कंपनीमध्ये मानव संसाधन विभागाचे प्रमुख असलेल्या सिंग यांना मार्शल आर्टमध्ये विशेष गती होती. त्यामुळे त्यांनी या खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मोहन आणि मोना सिंग यांची रितिका ही मुलगी. मोहन यांनी आपल्या मुलीला अगदी लहानपणापासूनच कराटे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शालेय जीवनात पुढे सरकत असताना रितिका कराटेमध्येही प्रगती करत होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करीत तिने पारितोषिके पटकावली.
हे करत असतानाच २०१४ मध्ये एका रिअॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला. या कार्यक्रमात तिला पाहिल्यानंतर चेन्नई येथील सुधा कांगर या दिग्दर्शकांनी तिची भेट घेऊन तिला चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केली. रितिकाला अभिनयाची कोणतीही पाश्र्वभूमी नव्हती, मात्र अंगी असलेल्या बिनधास्त वृत्तीमुळे तिनेही लगेच होकार दिला. ‘इरूधी सुत्तरू’ असे नाव असलेल्या या चित्रपटाची राजकुमार हिरानी यांनी ‘साला खडूस’ नावाने या हिंदीमध्ये आणला.
पहिल्याच चित्रपटामध्ये तिला आर. माधवनसोबत काम करण्याची संधी मिळाली, याचेही तिला कौतुक आहे. तर पुढील काळात तिच्या आणखी दोन तमिळ चित्रपट सुरू आहेत. मात्र त्याहीपेक्षा ‘साला खडूस’ आणि ‘इरूधी सुत्तरू’मधील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद तिला अधिक आहे. त्याच वेळी कराटेवरून आपले लक्ष तिने ढळू दिलेले नाही. पुढील वर्षी जर्मनीमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही ती सहभाग घेणार आहे, अशी माहिती तिचे वडील मोहन सिंग यांनी दिली.
श्रीकांत सावंत
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
रितिकाच्या रूपात राष्ट्रीय पुरस्कारांवर कल्याणचा ठसा
घरात मार्शल आर्टचे वातावरण असल्याने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ती कराटेचे धडे गिरवू लागली.
Written by श्रीकांत सावंत

First published on: 13-05-2016 at 02:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saala khadoos actress ritika singh on winning national award for her role as a boxer