पूर्वी मी नाटकातून काम करत होतो. पण चित्रपटातून भूमिका करायला लागल्यानंतर त्यात व्यग्र झालो आणि नाटक करणे मागे पडले. पण पुन्हा नाटक करायचे झाले तर ‘एकच प्याला’ मधील ‘तळीराम’ची भूमिका करायला मला आवडेल, असे प्रतिपादन अभिनेते सचिन खेडेकर यांनी नुकतेच येथे केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमात आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. रसिकांनी खेडेकर यांच्याशी थेट संवाद साधला.
दक्षिणेकडील चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाविषयी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, दक्षिणेकडील तीन चित्रपटात मी काम केले. इथे काम करताना चित्रपटाचे संवाद मी माझ्या परीने लिहून घेतो आणि संवाद म्हणतो. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या चित्रपटाविषयी ते म्हणाले की, रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी रंगभूषा करून माझी हनुवटी थोडी वाढविली. केस विशिष्ट आकारात कापले. रंगभूषा आणि वेशभूषेसह मी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांकडे गेलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला तर त्या माझ्याकडे खूपवेळ नुसत्या पाहातच राहिल्या. अर्धी लढाई मी येथेचजिंकली होती. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन व चित्रपटातील संवादफेक यात खूप फरक आहे. चित्रपटात भूमिकेनुसार मी शब्दफेक करतो, असे खेडेकर यांनी सांगितले.