बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांच्यात ‘फेसबुक’ फॉलोअर्सच्या संख्येवरून सध्या स्पर्धा सुरू आहे. मात्र लवकरच येथेही अमिताभ बच्चन येथेही बाजी मारून ‘महानायक’ ठरण्याची शक्यता आहे. अमिताभ यांच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी ८० लाखांहून अधिक असून सलमान खानला ‘फेसबुक’वर १ कोटी ९० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सध्याचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे, कॉम्प्युटरचे आणि मोबाइलचे आहे. भारतातील कोटय़वधी नागरिक याचा वापर करत असून यात तरुणाईची संख्या सर्वात जास्त आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्सनी सगळ्यांनाच भुरळ घातली असून यात विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटींचाही समावेश आहे.
सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवर ७२ वर्षीय बच्चन यांनी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे घेत चाहत्यांबरोबरच येथेही प्रचंड मोठय़ा संख्येने फॉलोअर्स मिळविले आहेत. चाहते आणि फॉलोअर्सच्या या प्रचंड प्रतिसादाबाबत बच्चन यांनी ‘ट्विटर’वरून त्यांच्याप्रति आभार व्यक्त केले आहेत. सर्वसामान्यपणे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप ही सोशल नेटवर्किंगची माध्यमे तरुणांची म्हणून ओळखली जातात. पण अमिताभ बच्चन यांनी या माध्यमांवरही आपली हुकमत ठेवली आहे. ‘फेसबुक’प्रमाणेच बच्चन ‘ट्विटर’वरही सक्रिय आहेत.
आपल्या लाखो चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ ही दोन्ही प्रभावी माध्यमे असून आपण त्यांचा नियमित वापर करतो, असे बच्चन यांचे म्हणणे आहे. बच्चन यांनी २१ ऑगस्ट २०१२ रोजी ‘फेसबुक’वर आपले अकाऊंट सुरू केले आणि अवघ्या अध्र्या तासात केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही त्यांना सुमारे आठ लाख इतक्या हिट्स मिळाल्या.
बच्चन हे नियमितपणे ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’वरून चाहत्यांशी संपर्कात असतात. स्वत:बद्दल, कुटुंबीयांबाबतची काही माहिती ते येथे देत असतातच पण समाजातील विशेष घटनांबाबतही ते वेळोवेळी आपली मते ‘ट्विटर’वरून व्यक्त करत असतात.
अमिताभ यांच्याप्रमाणेच बॉलीवूडचे अन्य काही अभिनेतेही ‘फेसबुक’वर असून यात आमिर खान, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, अक्षय कुमार, शाहीद कपूर, शाहरुख खान, अजय देवगण, रणबीर सिंह ‘फेसबुक’वर आहेत.