काळवीट हत्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानने माफी मागितली आहे. २००३ मध्ये सलमान खानने जोधपूर सत्र न्यायालयात चुकीचे प्रतीज्ञापत्र दिले होते. हे प्रतिज्ञापत्र चुकून दिलं गेलं असं सांगत आता सलमानने या प्रकरणी माफी मागितली असून, उद्या या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे.

६ फेब्रुवारी रोजी जोधपूर सत्र न्यायालयात काळवीट हत्या प्रकरणी सुनावणी होणार होती. त्यावेळी सलमान खानने सुनावणीला वर्च्युअली उपस्थित राहण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याची ही विनंती न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली होती. आता सलमानच्या वकिलांनी सलमानने ८ ऑगस्ट २००८ रोजी चुकून चुकीचे प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे म्हटले आहे आणि यासाठी सलमानला माफ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

“८ ऑगस्ट २००३ रोजी हे प्रतिज्ञापत्र चुकून दिले होते कारण सलमान विसरला होता की, त्याचे लायसन्स नूतनीकरणासाठी देण्यात आले होते. सलमान सतत कामात व्यस्त असल्यामुळे तो विसरला होता. त्यामुळे न्यायालयात त्याने लायसन्स हरवल्याचे सांगितले होते’ असे सलमानचे वकील सारस्वत यांनी न्यायालयाला सांगितलं आहे.

सलमान खानला १९९८ साली काळवीट हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. याप्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्याला ६ दिवस तुरुंगात रहावे लागले होते. त्यानंतर या प्रकरणी २००३मध्ये सलमान खानने कोर्टात त्याचे लायसन्स हरवल्याचे सांगितले होते. सलमानने वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून, नूतनीकरणासाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती न्यायालयाला कळाली होती. त्यानंतर सरकारी वकील भवानीसिंग भाटी यांनी सलमानविरोधात न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

२०१८मध्ये न्यायालयाने ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमान खानने काळवीट हत्या प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. सलमान खानने न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होतं. सलमानसोबत घटनास्थळी हजर असलेले सलमानचे साथीदार सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे निर्दोष सुटले आहेत.