सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून रातोरात गायिका झालेल्या रानू मंडल यांना बॉलिवूड अभिनेत हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात गाण्याची संधी दिली. या गाण्याच्या रेकॉर्डींगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेशने जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे मानधन दिले आहे. आता रानू यांच्या मदतीला बॉलिवूडचा भाईजान देखील धावून आला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
रानू यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्यामुळे त्या रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन तेथेचे आपले जीवन व्यतीत करीत होत्या. नेहमी अनेकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सलमान खानने रानू यांना देखील मदत केली आहे. सलमनाने डोक्यावर छत नसणाऱ्या रानू यांना ५५ लाखांचे घर भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सलमानकडून या गोष्टीचा अद्याप खुलासा झालेला नाही. रानू यांच्या सुरेल आणि मधूर आवाजाने सलमानचे मन जिंकले असल्यामुळे त्याने रानू यांना घर भेट म्हणून दिले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.
हिमेश रेशमियाचा लवकरच ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटासाठी रानू मंडल यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताचा रानू यांचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने त्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले हे रानू स्वीकार करत नव्हत्या. मात्र हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले. इतकच नाही तर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असेही सांगितले.
रानू या मुळच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या. पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. त्या रेल्वेमध्ये गाणे गात कोलकात्याला पोहोचल्या आणि कोलकाताच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गाऊन आपल्या जीवनाचा गाडा चालू लागल्या. तेथे त्यांना अतिंद्र चक्रवर्ती हा तरुण भेटला. पेशाने इंजीनिअर असलेल्या अतिंद्रने रानू यांचा सुरेल आवाज ऐकला आणि त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रानू यांना मुंबईत घेऊन येणारा व्यक्तीसुद्धा हाच आहे. त्यांना गायनाची संधी देणाऱ्या हिमेशचे अतिंद्रने आभार मानले आहेत.
अतिंद्रने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे रानूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचंही भरभरून कौतुक होत आहे.