बॉलिवूडमध्ये सध्या जवळपास सर्वच चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कमाईचे विक्रम मोडित काढत ‘दंगल’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली कुस्तीपटू गीता- बबिता फोगट यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचे या चित्रपटामध्ये चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी गीता-बबिताच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेख. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या फातिमा आणि सान्या या दोघींमध्येही एक प्रकारचे घनिष्ट मैत्रीचे नाते तयार झाले आहे.
पडद्यावर ज्या आत्मियतेने या दोघींनीही सख्ख्या बहिणींच्या व्यक्तिरेखा रंगवल्या होत्या त्याचप्रमाणे नेहमीच्या आयुष्यातही फातिमा आणि सना नेहमीच एकमेकींना सर्वाधिक महत्त्व देतात. फातिमाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सान्या म्हणजेच ‘दंगल’मधील बबिताने एक खास प्रकारचा केक मागविला होता. या केकचे डिझाइन एखाद्या आखाड्याप्रमाणे करण्यात आले होते. ज्यामध्ये गीताची प्रतिकृती असलेली एक प्रतिमाही ठेवण्या आली होती. फातिमा आणि सान्या या दोघींनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन इन्स्टा स्टोरीच्या रुपात खास बर्थडे पार्टीचे काही फोटो पोस्ट केले होते.
दरम्यान, ‘दंगल’ या चित्रपटातून फातिमा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. कारण कमल हसन यांच्या ‘चाची ४२०’ या चित्रपटामध्ये कमल हसन आणि तब्बूच्या लहान मुलीच्या भूमिकेमध्ये जी मुलगी झळकली होती ती मुलगी म्हणजे फातिमा सना शेख. फातिमाने विविध मालिका आणि काही चित्रपटांमध्येही छोटेखानी भूमिका साकारल्या आहेत.