संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटावर बऱ्याच राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनात सध्या बऱ्याच अडचणी असल्याचे म्हटले जाते. यामध्ये आता भर पडली आहे. गोव्यातील भाजपच्या महिला आघाडीने भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. याविषयी योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.
पर्यटनासाठी ओळखल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला अनुसरून कोणताच हलगर्जीपणा करणे योग्य नाही. त्यातही ऐन पर्यटकांची गर्दी असणाऱ्या काळात अशा राज्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये हा मुद्दा अधोरेखित करत, ‘पद्मावती’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
गोव्यातील भाजपच्या महिला आघाडीने अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली एक मोर्चा काढत पर्रिकर यांच्याकडे ‘पद्मावती’वर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपले मत मांडले. सध्यातरी ‘पद्मावती’ला सेन्सॉरने प्रमाणित केलेले नाही. त्यामुळे याविषयी सध्या कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. परंतु, महिला आघाडीतर्फे चित्रपटाला करण्यात येणारा विरोध योग्य असल्याचे पर्रिकरांचे मत आहे.
वाचा : ओव्हल स्टेडियममध्ये विराट- अनुष्का अडकणार लग्नाच्या बेडीत?
‘हा आपल्या देशाचा इतिहास आहे. राणीने स्वसंरक्षणासाठी जौहर केला होता, यावर अनेकांचा विश्वास आहे. पण, चित्रपटात आता नेमक्या कोणत्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत त्याविषयी मला काहीच बोलायचे नाही. याबाबतची सर्व जबाबदारी सेन्सॉरकडे आहे. पण, इतिहासाची कोणतीही मोडतोड न करताच तो सर्वांसमोर मांडला गेला पाहिजे’, असे ठाम मत पर्रिकरांनी मांडले.