गानसरस्वती कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा गानसरस्वती पुरस्कार मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पं. संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी ‘जसरंगी’ नामक जुगलबंदीचा अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केला आहे.

‘हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी खरंच फार आनंदाची गोष्ट आहे. या पुरस्काराच्या रुपाने मला एक प्रकारे किशोरी ताईंचा आशिर्वादच मिळाला आहे’, असं पं. संजीव अभ्यंकर म्हणाले.

दरम्यान, भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात यश मिळवलेल्या ५० वर्षांहून कमी वयाच्या कलाकारास हा गानसरस्वती पुरस्कार दिला जातो. १ लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१७ साली पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना प्रदान करण्यात आला होता.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjiv abhyankar announced the award ganasarasvati
First published on: 01-10-2018 at 18:23 IST