एखाद्या पिकावर टोळधाड यावी तशी ‘ट्रोल’धाड सध्या ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावर आली आहे. स्पर्धेत उत्तमोत्तम बाल कलाकार आपले सादरीकरण करत असले तरी परीक्षकांना मात्र ट्रोल केले जात आहे. हे परीक्षक तेच आहेत त्यांना महाराष्ट्राने याच कार्यक्रमाच्या आधीच्या पर्वात डोक्यावर घेतले होते. मग असे असतानाही ही ‘ट्रोल’धाड कशी आणि कुठून आली असा प्रश्न पडतो.

झी मराठीवरील ‘सारेगमप’ लिटिल चॅम्पच्या पहिल्या पार्वतील आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन ही पंचरत्ने सध्या कर्तृत्वाच्या बळावर ‘सारेगमप – लिटिल चॅम्प्स’च्या तिसऱ्या पर्वाच्या परीक्षकपदी बसले आहेत. त्यांचे गायन हे एका विशिष्ट उंचीचे असले आणि ते प्रेक्षकांनी मान्यही केले असले तरी  त्यांच्या परीक्षक होण्यावर किंवा परीक्षकाच्या खुर्चीतून त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर, हावभावांवर आक्षेप नोंदवला जात आहे. समाजमाध्यमांवर त्यांची खिल्ली उडवण्यात अनेकांनी जणू कंबरच कसली आहे.

गाण्यासोबतच आर्याचे दिसणे ही तिची जमेची बाजू. त्यामुळे कार्यक्रमाच्या पहिल्याच भागानंतर गाणे ऐकण्यासाठी नाहीत तर आर्याला पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केल्याचे मिम्स सर्वत्र प्रसारित झाले. जसे जसे भाग रंगत गेले तसे इतरही परीक्षांवर प्रतिक्रिया येऊ लागल्या. रोहितचे वागणे अति आहे, एका बडय़ा संगीतकाराची ही नक्कल आहे, हे परीक्षक एकाच वेळी एकच हातवारे कसे करतात, सतत त्याच प्रतिक्रिया कशा दिल्या जातात, डोळ्यात आलेले पाणी खोटे आहे, हा सगळा बनाव आहे, एकाच वेळी पाचही पोरं कामाला लागली अशा अनेक टिप्पण्या केल्या जात आहे. काहींनी यांच्या पात्रतेवरही शंका घेतलेली आहे. प्रत्येक भागानंतर विविध मिम्स समाजमाध्यमांवर येतच आहेत. ही नकारात्मक बाजू सतावणारी असली तरी त्यानिमित्ताने ट्रोल करणारी मंडळीही कार्यक्रम पाहात आहे असे दिसते. कारण सध्या या कार्यक्रमाचा टीआरपी चांगलाच वर आहे.

पहिल्यांदाच परीक्षक पद स्वीकारलेले असताना अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया कुठेतरी मनाला चटका लावून जाणाऱ्या वाटतात. परंतु अशा ट्रोलर्सकडे वाहिनीने सर्रास दुर्लक्ष करायचे ठरवलेले दिसते. कारण बोलणाऱ्यांचे तोंड कुणीही धरू शकत नाही हा नीतीचा सरळ नियम आहे. मुळात त्यांचे कर्तृत्व त्यांनी महाराष्ट्रासमोर आधीच सिद्ध केलेले असताना आता ही परीक्षा कशासाठी असा प्रश्नही काही जण विचारतात. झी मराठीने प्रत्येक परीक्षकाविषयी म्हणजे त्या पाचही जणांचे संगीत क्षेत्रातील कार्य, शिक्षण, पुरस्कार याचा उल्लेख असलेले पोस्टर समाजमाध्यमांवर पोस्ट केले होते. ट्रोलर्सला यातून चोख उत्तर मिळते.

मुळात ते काही सरावलेले परीक्षक नाहीत किंवा संहितेनुसार हावभाव करणारे नट नाहीत. त्या खुर्चीत बसलेले असताना स्पर्धकांचे गाणे ऐकून त्यांना त्या त्या वेळी जे सुचते ते दिलखुलासपणे मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अर्थात त्याचा अतिरेक होत असेल किंवा कुठेतरी सरमिसळ वाटत असेल तर पडद्यावर आपण कसे दिसतो, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत, अजून काय बदल करता येईल याचाही विचार त्यांनी परीक्षक म्हणून वैयक्तिक पातळीवर करायला हवा. कदाचित तो सुरूही झाला असेल. कारण कोणतीही गोष्ट कळायला, उमजायला वेळ लागतो. प्रस्थापित परीक्षकांची चौकट मोडून झी मराठीचा या पंचरत्नांना परीक्षकपदी घेण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. फक्त प्रेक्षकांनीही त्यांना वेळ द्यायला हवा. बाकी कार्यक्रम गाण्याचा आहे, परीक्षणाचा नाही याचे भानही असायला हवे, असा सूरही आता उमटू लागला आहे.