प्रयोगशीलता हा कलाविश्वाचा कणाच आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत प्रत्येक गोष्टीमध्ये ही कलात्मकता आणि नावीन्य पाहायला मिळतं. याचीच प्रचिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत फार आधीपासून पाहायला मिळाली. प्रेक्षकांसमोर सुरेख चित्रपटांचा नजराणा सादर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या काही कलाकारांपैकी एक नाव म्हणजे कमल हसन. विविध धाटणीच्या कथानकांना न्याय देत या अभिनेत्याने आजवर ‘एक दुजे के लिये’, ‘सदमा’, ‘जरासी जिंदगी’, ‘राज तिलक’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीतील असाच एक चित्रपट म्हणजे ‘अप्पूराजा’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Singeetam Srinivasa Rao संगीतम श्रीनिवास राव दिग्दर्शित ‘अप्पूराजा’ म्हणजेच ‘अपूर्वा साहोदारुलू’ने Apoorva Sahodarulu भारतीय चित्रपटविश्वात एक वेगळंच वलय निर्माण करुन गेला. आजही नव्या संकल्पनांच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या चित्रपटांमध्ये ‘अप्पूराजा’ अग्रस्थानी आहे. कमल हसन यांच्या अभिनयासोबत या चित्रपटातून एक कलाकार त्याच्या भूमिकेला जिवंत करण्यासाठी सर्वस्व पणाला लाऊ शकतो, याचाच प्रत्यय आला होता. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. पण त्या भूमिकांपैकी एका भूमिकेत ते बुटक्याच्या रुपात दिसले होते. त्यांनी साकारलेल्या बुटक्या व्यक्तीची भूमिका म्हणजे एक प्रकारचं आव्हानच होतं. आजही त्यांच्या या भूमिकेविषयी अनेकांमध्ये बरंच कुतूहल पाहायला मिळतं. त्यांच्या या भूमिकेसाठी बऱ्याच गोष्टींवर काम करण्यात आलं होतं. कॅमेरा अँगल, खास बूट, हात, कृत्रिम पाय अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करत हा अप्पूराजा साकारण्यात आला होता. याविषयीची माहिती देत खुद्द या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच काही खुलासे केले होते. चला जाणून घेऊया ते खुलासे आहेत तरी काय…

वेगळ्या प्रकारचे बूट- कमल हसन यांनी साकारलेल्या अप्पूच्या भूमिकेसाठी वेगळ्या प्रकारचे बूट बनवून घेण्यात आले होते. दुमडलेल्या गुडघ्यांचा आधार घेत हे बूट, पायात घातले आहेत असंच दाखवण्यात आलं होतं. या भूमिकेसाठी बूट जरी वेगळ्या प्रकारे बनवून घेतले असले तरीही त्यावेळी कमल हसन यांची मेहनतही प्रशंसनीय ठरली होती. पायांप्रमाणेच हातही आखुड दाखवण्यासाठी कमल यांनी हात वेगळ्या प्रकारे दुमडले होते. यासाठी त्यांनी जवळपास पंधरा दिवस बुटक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सराव केला होता.

कॅमेरा अँगल – त्यांची बरीच दृश्य ही ‘स्ट्रेट अँगल शॉट’मधून घेण्यात आली. पण, ‘साइड अँगल शॉट’मधून चित्रीत करताना मात्र काही अडचणी आल्या होत्या. त्यावेळी ‘ट्रेंच’ म्हणजेच चर खणून त्याच्या मदतीने हसन यांचे पाय दिसणार नाहीत अशी रचना करुन त्या दृश्यांचं चित्रीकरण करण्यात आलं. ‘क्रेन शॉट’साठीसुद्धा दिग्दर्शकाने याच तंत्राचा वापर केला होता.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

कृत्रिम पाय- कमल हसन साकारत असलेली अप्पूची भूमिका वास्तववादी करण्यासाठी त्यातील अनेक बारकावे टिपण्यात आले होते. यासाठी कृत्रिम पायही तयार करुन घेतले होते. बसलेल्या, नाचण्याच्या किंवा मग खुर्चीचा आधार घेत चित्रीत करण्यात आलेल्या या दृश्यांमध्ये कमल हसन यांच्यासाठी त्या कृत्रिम पायांचा वापर केला होता. वासुदेवन या इंजिनियरने तयार केलेले हे कृत्रिम पाय धाग्याच्या साह्याने नियंत्रित ठेवत त्यांची हालचालही त्याच धाग्यांच्या आधारे करण्यात आली होती. या चित्रपटासाठी वापरण्यात आलेले तंत्र त्या काळात तसं पाहायला गेलं तर फारच कठीण होतं. पण, अशक्य गोष्टी आणि काही आव्हानं स्वीकारण्यावरच या कलाविश्वाने आजवर भर दिला आहे. त्यामुळे ‘अप्पूराजा’ साकारण्यासाठी कलाकारांची मेहनत आणि राव यांच्या दिग्दर्शनाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secrets behind kamal hasans dwarf role in movie appu raja
First published on: 20-07-2017 at 10:47 IST