बॉलीवूडचा रंगून अभिनेता शाहिद कपूर याने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवर त्याच्या लाडक्या लेकीची पहिली झलक शेअर केली. सूर्यास्ताच्या वेळी काचेच्या पलीकडे उभं राहून शाहिदने मिशासोबत काढलेला सेल्फी शेअर केला आहे. आपल्या मुलीवर असलेले प्रेम शाहिदने एकार्थी दाखवून दिले आहे.

जर या फोटोकडे निरखून पाहिले तर काचेच्या मागे समुद्र दिसतो. त्यामुळे इतक्या सुंदर वातारवणात आपल्या लाडक्या लेकीसोबत फोटो काढण्यापासून शाहिद स्वतःला रोखू शकला नाही हेच दिसते. त्याने फोटोला कॅप्शनही दिलेय की, ‘सनसेट विथ माय एन्जल’. काही दिवसांपूर्वीच शाहिदने त्याच्या मनातली भीती व्यक्त केली होती. मिशाने मोठं झाल्यावर तिला अभिनेत्री बनायचे असल्याचे सांगितल्यास मला भीती वाटेल, असे तो म्हणाला होता. शाहिद आणि मीरा त्यांच्या मुलीप्रती अतिशय काळजीपूर्वक वागतात.

शाहिदच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तो वाट पाहत आहे. ‘रंगून’ चित्रपटाविषयी बोलताना शाहिदने दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या कामाची प्रशंसा केली. शाहिद म्हणालेला की, विशाल भारद्वाज सरांसोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे. त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी नेहमी खूप महत्त्वाचे आणि खास असते. लोक हा चित्रपट पाहतील आणि त्यांना तो आवडेल अशी मी अपेक्षा करतो. माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी रंगून प्रदर्शित होतोय. त्यामुळे अपेक्षा करतो की, चित्रपटाच्या यशानेच मी माझा वाढदिवस साजरा करेन, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शाहिद असे म्हणाला होता. यात सैफ अली खान असून त्याने याआधी भारद्वाजसोबत ‘ओमकारा’ चित्रपटात काम केले होते. तर अभिनेत्री कंगना रणौत यात मिस जुलियाची भूमिका साकारत आहे. शाहिद कपूर, सैफ अली खान आणि कंगना रणौत अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘रंगून’ येत्या २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.