रेश्मा राईकवार

गेल्या काही वर्षांत लागोपाठ आलेल्या विनोदी भयपटांची लाट बाजूला सारून जीवाचा थरकाप होईल अशा पध्दतीची मांडणी असलेले कथानक वा तशी व्यक्तिरेखा समोर ठेवून केलेला ‘शैतान’ चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा प्रोमो पाहिल्यानंतर हा चित्रपट यात दुष्ट, विकृत खलनायक रंगवणाऱ्या अभिनेता आर. माधवनचा असणार हे अपेक्षित होते. चित्रपटात अगदी सुरुवातीपासूनच आर. माधवन चित्रपटाचा नायक अभिनेता अजय देवगणवर भारी पडला आहे यात शंकाच नाही. मात्र कथाकल्पना, कलाकार कितीही भारी असू दे, पठडीबाज पध्दतीनेच त्याची मांडणी करायची हा बॉलीवूडचा आग्रह इतक्या वर्षांत बदललेला नाही. त्यामुळे नायकप्रेमी चित्रपटांची चौकट न सोडण्याच्या या आग्रहापायी ‘शैतान’चाही बळी गेला आहे.

Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
Rape Case
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार, चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने लिहिलं अमन
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!

भयपटांचेही त्यातही अतिमानवी शक्तींवर आधारित चित्रपटांचेही आपल्याकडे ठरावीक साचे आहेत. त्या साच्यात भुताने वा कुठल्यातरी दुष्ट शक्तीने झपाटलेले चित्रपट अधिक आहेत. ‘शैतान’ हा गुजराती चित्रपट ‘वश’चा रिमेक आहे. या चित्रपटाची कथा कृष्णदेव याज्ञिक यांची आहे, गुजराती चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांचंच होतं. हिंदीत मात्र कृष्णदेव यांची कथा नव्याने डागडुजी करण्यात आली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा विकास बहल यांनी सांभाळली आहे. मूळ चित्रपटाचं शीर्षकच ‘वश’ आहे, त्यामुळे वशीकरणावर आधारित हा चित्रपट आहे. एक मुलगी-एक मुलगा आणि पती-पत्नी असं चौकोनी सुखी कुटंब, हे कुटुंब कसं आनंदी आहे, खातंपितं आहे हे एका गाण्यातून आणि मोजक्या प्रसंगातून दाखवल्यानंतर अजिबात वेळ न दवडता दिग्दर्शक आपली ओळख वनराज कश्यप नामक यातल्या सैतानी व्यक्तिरेखेशी करून देतो. सुट्टी घालवण्यासाठी फार्म हाऊसवर येण्यासाठी निघालेल्या कबीर आणि त्याच्या कुटुंबाची प्रवासादरम्यान वनराजशी ओळख होते. वनराज त्यांचा पाठलाग करत फार्म हाऊसवरही पोहोचतो. कुठल्याशा बहाण्याने घरात शिरलेला हा इसम कबीरची मोठी मुलगी जान्हवी हिला वश करून घेतो आणि त्या क्षणापासून कबीर आणि त्याच्या कुटुंबासाठी दैवाचे फासे वेगाने बदलू लागतात. एक चौकोनी हसरं कुटुंब ते विनाशाच्या टोकावर डगमगण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा काही तासांत होतो.. सगळाच खेळ संपायच्या आत हतबल कबीर ते कशा पद्धतीने सावरणार? याचं वेधक चित्रण ‘शैतान’ या चित्रपटात पाहायला मिळतं.

हेही वाचा >>>Video: ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या महाअंतिम सोहळ्यासाठी पोहोचल्या अमृता फडणवीस; क्रिती सेनॉन, पूजा हेडगेसह करणार परीक्षण

 ‘शैतान’ हा चित्रपट पहिल्या फ्रेमपासून देखणा केला आहे. चित्रपटातील प्रत्येक दृश्याचा पुरेपूर वापर भयनिर्मितीसाठी केला गेला आहे. मात्र इथे या चित्रपटात कुठल्याही प्रकारे भूत वा आत्म्याचा खेळ नाही. सगळा खेळ हा विकृत विचाराने प्रेरित एका माणसाच्या भयंकर कृतीशी जोडला गेलेला आहे. हसतखेळत सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आपल्याला भेटलेली व्यक्ती काळी जादू करून आपल्याला नाचवणार आहे याची कल्पना येणं शक्य नाही. आणि काही कल्पना यायच्या आत या कुटुंबातल्याच मुलीला जान्हवीला वनराजने वश करून आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हतबल आई-वडिलांच्या वाटय़ाला जे जे काही येतं ते सारं या कथानकात पाहायला मिळतं. या चित्रपटातील दोन गोष्टींनी त्याचं भरकटलेपण सावरून घेतलं आहे. आर. माधवनने अतिशय थंड डोक्याने साकारलेला वनराज, त्याचा अभिनय आणि देहबोली याचबरोबर त्याचं निरागस म्हणण्यापेक्षा निर्धोक दिसणं याचा पुरेपूर वापर त्याने या भूमिकेसाठी करून घेतला आहे. यात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या जानकी  बोडीवाला हिनेच गुजराती चित्रपटातही जान्हवीची भूमिका केली होती. तिने इथेही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. अजय देवगणला अशा संकटकाळी काहीही करून आपल्या कुटुंबाला वाचवणाऱ्या बापाच्या भूमिकेत पाहणं आता प्रेक्षकांनाही सवयीचं झालं आहे. त्यामुळे आर. माधवनचा अभिनय हाच काय तो वेगळेपणा म्हणता येईल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भयपट असला तरी या चित्रपटाची प्रत्येक दृश्यचौकट देखणी झाली आहे. विकास बहल यांची दिग्दर्शकीय मांडणी ही वास्तविक चित्रपटांच्या शैलीतली आहे. त्यामुळे इथे त्याचा प्रभाव जाणवतो. त्याला विनाकारण व्हीएफएक्स जोडत भव्यदिव्य करण्याचा सोस दिग्दर्शकाने टाळला आहे. त्याऐवजी विचित्र जीवघेण्या संकटात अडकलेल्या व्यक्तिरेखांमधील नाटय़ावर अधिक भर देण्यात आला आहे. या मांडणीला छायाचित्रण करणाऱ्या सुधाकर रेड्डी यंकट्टी यांच्या कॅमेऱ्याने देखणेपणाची जोड दिली आहे. हिरव्यागार जंगलातली शांतता त्याच्या हिरवाईसह टिपणारा कॅमेरा बंदिस्त खोलीत सुरू असलेल्या थरारनाटय़ात अडकलेल्यांची असहाय्यता, जीवघेणी शांतताही पुरेशी बोलकी करतो. नुसताच भीतीच्या नावाखाली विनाकारण वेगवेगळय़ा आवाजांचा, संगीताच्या तुकडय़ांचा वापर न करता अभिनय आणि मानसिकदृष्टय़ा प्रसंगातील तणावांच्या आधारे केलेल्या मांडणीमुळे चित्रपट चांगला वाटतो. मात्र अगदी शेवटपर्यंत ताणलेल्या या थरार नाटय़ाचा शेवट नायकाच्या विजयानेच होणार हे सत्य आपण पचवलेलं असल्याने ते कसं? इतकाच भाग आपल्याला पाहायचा असतो. आर. माधवनची व्यक्तिरेखा आणि त्याचा अभिनय अप्रतिम असला तरी नायकाच्या प्रतिमेपुढे त्याचा पाड लागू द्यायचा नसल्याने हा ‘शैतान’ आपल्याला फारकाळ घाबरवून ठेवू शकत नाही. भयपटाची सुखांतिका आपल्या मनात आधीच तयार झालेली असते त्यामुळे पठडीबाज रंजनापलीकडे आपल्या हाती काही लागत नाही.

‘शैतान’

दिग्दर्शक – विकास बहल

कलाकार – आर. माधवन, अजय देवगण, ज्योतिका सदाना, जानकी बोडीबाला , अंगद राज.