टेलिविश्वात ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेता शशांक केतकरने मराठी रंगभूमी आणि चित्रपट दोन्ही माध्यमांत प्रवेश केला. आता ‘वन वे तिकीट’ या पहिल्या चित्रपटानंतर शशांकचा ‘३१ दिवस’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयाबरोबरच आता लेखन-दिग्दर्शन करण्याचा मानसही त्याने व्यक्त केला.
मालिका ते चित्रपटांपर्यंतच्या त्याच्या आजवरच्या प्रवासाकडे नजर टाकताना, ‘होणार सून मी या घरची’ ही कौटुंबिक गोष्ट होती. त्यात प्रेमकथा होती. ‘गोष्ट तशी गमतीची’ हे प्रभावी व्यावसायिक नाटक होतं. त्याचे जगभर प्रयोग केले. त्यानंतर ‘आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल’ हे गजेंद्र अहिरे लिखित, दिग्दर्शित नाटक केलं आणि आता ‘३१ दिवस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय, अशी माहिती शशांक देतो. या चित्रपटात शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा आव्हानात्मक भूमिका आहे. मकरंद नावाची ही व्यक्तिरेखा आहे, तो कॉलेजमध्ये नाटकं बसवणारा मुलगा आहे. त्याला एकदा अंध शाळेच्या मुलांचं नाटक बसवण्याची संधी मिळते. तो नाटय़वेडा तरुण असल्याने या मुलांना कसं शिकवायचं?, याचा विचार सुरू करत तो एक पटकथा लिहितो. ती पटकथा घेऊन निर्मात्यांकडे फिरतो, अखेर एक निर्माता चित्रपट करण्यासाठी तयार होतो. चित्रीकरण सुरू होतं. आपण लिहिलेली पटकथा स्वत: दिग्दर्शित करायची हे त्याचं स्वप्न असतं, पण त्या दरम्यान काही घटना घडतात. त्यामुळे मकरंद आणि त्याच्या टीमला विचित्र घटनेला सामोरं जावं लागतं. त्यातनं तो कशी वाट काढतो? त्याला वाट सापडते की नाही?, या सगळ्याचा प्रवास म्हणजे ‘३१ दिवस’, असो तो म्हणतो. स्वप्न बघण्यापासून ते स्वप्न पूर्ण करण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे ‘३१ दिवस’ हा चित्रपट आहे. शशांकला ही भूमिका खूप भावली असल्यामुळे तो त्याविषयी भरभरून बोलत होता. त्यामुळे पुढचा प्रश्न साहजिकच असा होता की नाटक, चित्रपट आणि मालिका यापैकी कुठलं माध्यम त्याला जवळचं वाटतं? पण त्यावर त्याने प्रामाणिक उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘नाटक, चित्रपट आणि मालिका’ या तिन्ही माध्यमांमध्ये मी सहज रमतोही आणि नाहीही असं म्हणता येईल. कारण प्रत्येक वेळी चित्रीकरण सुरू झालं. कॅमेरा सुरू झाला की स्वत:चा नव्याने शोध घेणं सुरू होतं. मग टीम कशी आहे, हे मी बघतो. त्यामुळे माध्यम सोपं कुठलं असं म्हणाल तर ही तिन्ही माध्यमं तुमची परीक्षा घेणारीच असतात मात्र मला मनापासून नाटक करायला आवडतं’.
अभिनयाबरोबरच सध्या शशांक लेखनाकडेही लक्ष देतोय. स्वत: काही गोष्टी तो लिहितोय. त्या गोष्टीही चित्रपट रूपात प्रेक्षकांसमोर येतील, असं तो म्हणतो. मराठीमध्ये सध्या समाजप्रबोधन करणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढतेय. जणू काही मराठी चित्रपटांनी प्रबोधनाचा ठेकाच घेतलाय अशा पद्धतीने मराठी म्हणजे समाजप्रबोधन, कुठल्या तरी स्तरातल्या लोकांच्या समस्या दाखवणारा चित्रपट, असं मत निर्माण झालं आहे. मात्र, चित्रपट प्रबोधनात्मकच असला पाहिजे, अशी काही गरज नाही आहे, असं त्याला वाटतं. मराठी चित्रपट हे मसाला, मनोरंजन करणारे तरीही तार्किक आणि संवेदनशील असे असू शकतात. त्याचंच पुढचं पाऊ ल म्हणून ‘३१ दिवस’ हा चित्रपट आहे, असं तो सांगतो. या चित्रपटाचं वैशिष्टय़ म्हणजे अथिरापल्ली म्हणजेच ‘बाहुबली’ चित्रपटाचं जिथे चित्रीकरण झालं, त्या धबधब्यावर याही चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण झालंय. क्लायमॅक्स शूटिंग चार दिवस सुरू होतं. चित्रीकरणाविषयी शशांक पुढे म्हणाला, ‘सेटची भव्यता, गाडय़ा कशा उडवल्यात? काचा फोडून तो बाहेर आलाय.. काय नाही केलंय ते विचारा. बॉलीवूड स्टाइल फाइटची दृश्ये दिली आहेत. आगीतून बाहेर आलोय..वगैरे. रोहित शेट्टी, अजय देवगणसाठी स्टंट डिझाइन करणारे सुनील रॉड्रिक्स यांच्यासोबत काम करताना धमाल आली. एक हिंदी गाणंही यात आहे’, हेही सांगायला तो विसरला नाही. या चित्रपटात अभिनेत्री मयूरी देशमुख त्याची नायिका आहे. तिच्यासोबत कामाचा अनुभव सांगताना तो म्हणाला, ‘मयूरीबरोबर काम करताना तिचा पहिला चित्रपट असला तरी तिला कॅमेराचा अनुभव होता. मलाही चांगल्या प्रकारे होता. चित्रीकरणावेळी ती काही गोष्टी मला विचारायची, मी तिला काही विचारायचो. कामाच्या बाबतीत आम्ही दोघेही प्रामाणिक असल्यामुळे मजा आली. प्रेक्षकांना आमची जोडीही आवडतेय. आणि चित्रपट पाहिल्यावरही आमची जोडी प्रेक्षकांना आवडेल’, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. चित्रपटात रमला तरी तो छोटय़ा पडद्याला विसरला नाहीय मात्र चांगल्या गोष्टीची वाट पाहतोय, असं तो म्हणाला. टेलिव्हिजनही तो गांभीर्याने घेतो, कारण या माध्यमाची ताकद त्याने ‘होणार सून मी या घरची’ मालिकेच्या वेळी अनुभवली आहे, असं तो सांगतो.पुढे तो म्हणाला, ‘मी अमुक एखादी भूमिका करायचीय असं स्वप्न बघत नाही, कारण तशी भूमिका मिळाली तर संपलंच सगळं, असं त्याला वाटतं. प्रत्येक कलाकाराला चांगल्यातलं चांगलं काम करायचं असतं. घराघरात पोहोचायचं असतं. प्रेक्षक आपले चाहते असले पाहिजेत असं वाटतं, तसंच मलाही वाटतं. एक माणूस म्हणून मला जे काही चांगलं, प्रयोगशील करता येईल. ते सतत करत राहणार आहे’, असंही त्याने सांगितलं. त्याला चित्रपटातील मनोरंजन हा महत्त्वाचा घटक वाटतो. तोच नसेल तर प्रेक्षकांनी तिकिटं का काढावीत?, असा प्रश्न तो विचारतो. ‘३१ दिवस’ या चित्रपटानंतर शशांक नाटकाकडे वळणार आहे. अजून दोन चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत, असेही त्याने सांगितले.