अभिनेत्री लारा दत्तासाठी दिग्दर्शक शशांक घोष चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. लारा दत्ताचीच निर्मिती असलेल्या ‘चलो दिल्ली’ या चित्रपटाचा हा पुढील भाग असणार आहे.
शशांक घोष यांनी याआधी ‘वैसे भी होता है-२’ आणि  ‘क्विक गन मुरूगन’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. लारा दत्ता लवकरच या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतणार असून घोष त्याचे दिग्दर्शन करणार आहे.
आम्ही या चित्रपटावर गेले वर्षभर चर्चा करत आहोत. चित्रपटाच्या इतर बाबींचे काम सुरू असून पटकथेचा पहिला भाग तयार झाला असल्याचे घोष पीटीआयशी बोलताना म्हणाले.
‘चलो दिल्ली’ चित्रपटाचा प्रवास पुढील भागात आता ‘चायना’ पर्यंत नेण्यात आला असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती घोष यांना विचारली असता निर्मातेच याबाबत बोलतील असं ते म्हणाले.
‘चलो दिल्ली’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. माजी विश्वसुंदरी लारा दत्ताने आपल्या ‘भिगी बसंती प्रोडक्शन’द्वारे या चित्रपटाची निर्मिती केली होती.  
‘दसविदानिया’ चे दिग्दर्शक शशांत शहा यांनी ‘चलो दिल्ली’ चे दिग्दर्शन केले होते. लारा दत्तासोबत हरहुन्नरी अभिनेता विनय पाठक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. ‘चलो दिल्ली’ चित्रपटाचे समिक्षकांनीही विशेष कौतुक केले होते.