बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांची मैत्री ही गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे. या कालाकारांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सलमान आणि शिल्पा यांची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही त्यांच्या चर्चा रंगतात. यामध्ये अनेक वेळा रात्रीच्या वेळी सलमानचं शिल्पाच्या घरी जाण्यावरुन चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र यावर शिल्पाने बोलणं कायम टाळलं. शिल्पाला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसं बोलायला आवडत नाही. त्यामुळे ती ही गोष्ट सतत टाळायचा प्रयत्न करायची. मात्र एका मुलाखतीमध्ये तिने सलमान रात्रीच्यावेळी तिच्या घरी का यायचा या मागचं कारण सांगितलं.

शिल्पा आणि सलमानची घनिष्ट मैत्री असतानाही अनेक वेळा त्यांच्या अफेअरच्या अफवा चाहत्यांमध्ये पसरल्या होत्या. याविषयी शिल्पानेदेखील मौन बाळगलं होतं. मात्र एका मुलाखतीमध्ये तिने मौन सोडलं आणि या साऱ्या अफवांना पूर्णविराम दिला.सोबतच तो रात्री तिच्या घरी का यायचा हेदेखील सांगितलं.

“मी आणि सलमान आम्ही चांगले मित्र आहोत. मात्र त्या पलिकडे आमच्यात काहीच नाही. सलमान केवळ माझाच मित्र नसून त्याचे आणि माझ्या घरातल्यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्याचं आमच्या घरी येणं-जाणं सुरुच असतं. इतकंच काय तर तो मध्यरात्रीही आमच्या घरी येतो”, असं तिने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “सलमान अनेक वेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. घरी आल्यानंतर तो आणि माझे वडील एकत्र ड्रिंक करायचे आणि खूप गप्पा मारायचे. ज्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी तो आमच्या घरी आला होता आणि तो प्रचंड दु:खी होता. आमच्यात केवळ मैत्रीच आहे त्यापलिकडे आमच्यात कोणतंही नातं नाही”. दरम्यान, या दोघांनी ‘औजार’, ‘गर्व: प्राइड अण्ड ऑनर’, ‘फिर मिलेंगे’, आणि ‘शादी कर के फंस गया यार’ या चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं आहे. त्यानंतर शिल्पाने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केलं.