सत्तापिपासूंच्या कंपूत राहणारा, भ्रष्ट, लालची, देशाभिमान नसलेला वगैरे अशी पोलिसाची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आतापर्यंत आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळायची. ‘दबंग’ हा त्यातील अगदी अलीकडचे उदाहरण. आता मात्र पोलिसांची पडद्यावरील प्रतिमा बदलत असून ‘सिंघम’च्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात तर पोलिसांची प्रतिमा उंचावणारे ‘सिंघम रिटर्न’ व ‘मर्दानी’ असे एकापाठोपाठ एक असे दोन चित्रपट या महिन्यात झळकणार आहेत.
अजय देवगण आणि रोहित शेट्टी जोडीच्या बाजीराव ‘सिंघम’ने चित्रपटातीलच नव्हे तर वास्तवातही पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यात खारीचा वाटा उचलला होता. ‘सिंघम’मधला बाजीराव हा आपल्या तत्वांनुसार चालणारा, कर्तव्यात कसूर न करणारा पोलीस होता. त्यामुळे ‘सिंघम’ची कथा, त्याचा संघर्ष अगदी छोटा असूनही तो पोलिसांना भावला होता. कित्येक पोलिसांनी प्रत्यक्षात भेटून हे आपल्याला सांगितले. त्यामुळे ‘सिंघम रिटर्न’ बनवताना बाजीरावला मुंबईत आणून त्याच्या हाती खरोखरच गंभीर मुद्दा द्यावा, असा विचार केल्याचे अजय देवगणने सांगितले. ‘सिंघम’च्या अनुभवामुळे ‘सिंघम रिटर्न’ करताना पोलिसांचे खूप सहकार्य मिळाल्याचे तो म्हणाला. मात्र, ‘सिंघम’पेक्षाही प्रकाश झा दिग्दर्शित ‘गंगाजल’ चित्रपटातील एसपी अमित कुमार पोलिसांना जास्त आवडला होता. आणि अजूनही काही पोलिस अधिकारी जेव्हा भेटतात तेव्हा ते ‘गंगाजल’ची आठवण काढतात, अशी माहिती अजयने दिली. अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीने यावेळी काळया पैशाचा मुद्दा ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटात उपस्थित केला असून यावेळी एक पोलीस अधिकारी म्हणून बाजीराव अधिक योग्य पध्दतीने हा मुद्दा हाताळताना दिसणार असल्याचे त्याने सांगितले.
‘सिंघम रिटर्न’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ म्हणजे २२ ऑगस्टला राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणीने गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. यशराज फिल्म्सने यापूर्वी कधीही ‘मर्दानी’सारखा पोलिसांवरचा वास्तव विषय हाताळलेला नव्हता. मा़त्र, पहिल्यांदाच असा चित्रपट करताना प्रत्यक्षात पोलिसांची कार्यपद्धती कशी असते, गुन्हे अन्वेषण विभागाचे काम, त्यांची गुन्ह्यांचा उकल करण्याची पद्धत याचा प्रत्यक्ष अभ्यास करून ही व्यक्तिरेखा रंगवली असल्याचे राणीने सांगितले. राणीने ‘मर्दानी’मधून पहिल्यांदाच महिला पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. पोलिसांमध्ये कर्तव्याच्या बाबतीत स्त्री-पुरूष हा भेदभाव नसतो. त्यामुळे रात्री आपल्या मुलांना झोपवून इतरांच्या मुलांचे रक्षण करण्यासाठी महिला पोलीस तैनात असतात ही फार मोठी गोष्ट आहे. आणि या गोष्टी सर्वसामान्यांसमोर आल्याच पाहिजेत, असे मत राणीने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singham 2 and mardani will change police image on silver screen
First published on: 09-08-2014 at 12:09 IST