करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाउन वाढवायचं की नाही याबद्दल निर्णय घेणार आहेत. इतर राज्यांत कामासाठी आलेल्या परप्रांतातील कामगारांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या भागात इतर राज्यातील अनेक मजूर कामासाठी येत असतात. मात्र लॉकडाउनमुळे रोजगार तुटल्यामुळे या सर्वांचे घरी जाण्याचे रस्ते बंद झाले. केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली, पण प्रत्येकाला रेल्वेचा प्रवास परवडणारा नाही.

मुंबईतल्या अशाच परप्रांतीय कामगारांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सुद धावून आला आहे. कर्नाटकातील कामगारांसाठी सोनू सुदने १० खासगी बस गाड्यांची सोय केली आहे. सोमवारी ठाण्यावरुन या बसगाड्या कर्नाटकातील गुलबर्गा च्या दिशेने रवाना झाल्या. “सध्याच्या खडतर काळात प्रत्येक जणाला आपल्या परिवारासोबत राहण्याचा हक्क आहे. यासाठी मी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलून खास परवानगी मागितली आणि या कामगारांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे.” सोनू सुदने प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

या कामासाठी दोन्ही राज्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केल्याचं सोनूने नमूद केलं. याआधीही सोनूने मुंबईत अडकलेल्या मजुरांच्या राहण्याची सोय केली होती. याचसोबत आर्थिक मदतीसह सोनू सुदने डॉक्टरांना PPE किट देण्याचं कामही सोनू सुदने केलं होतं. याचसोबत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी सोनू सुदने आपलं हॉटेल राहण्यासाठी दिलं होतं.