करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये सरकारला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण घरात बसले आहेत. पण काही जण असे आहेत जे लॉकडाउन असूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. यामध्ये एका अभिनेत्रीचादेखील समावेश आहे.

तेलुगू, तमिळ आणि कन्नड अभिनेत्री शर्मिला मांड्रे संपूर्ण देशात लॉकडाउन असतानाही मित्र लोकेश वसंतसोबत बाहेर फिरत होती. दरम्यान तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये शर्मिला आणि तिच्या मित्राला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या दोघांवर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बंगळूरुमधील वसंतनगर येथे घडली आहे. शर्मिलाची गाडी वसंतनगर येथील अंडरब्रिजवर एका रेल्वेच्या पिलरला ठोकली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

पोलीस अधिकारी रविकांत गौडा यांनी या संदर्भात माहिती दिली. ‘सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील अभिनेत्री आणि तिचा मित्र घराबाहेर पडले कसे याचा शोध आम्ही घेत आहोत. ते दोघे ही फिरण्यासाठी बाहेर निघाले होते आणि हा गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शर्मिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. अभिनयासोबतच ती एक चित्रपट निर्माती देखील आहे.