प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाल्यामुळे चेन्नई रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर त्यांची करोना चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे. ही माहिती एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा मुलगा एस. पी. चरण यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली होती. म्हणून ते लवकर बरे व्हावेत यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करताना दिसत होते. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनीदेखील बालसुब्रमण्यम यांच्यासाठी प्रार्थना केली होती. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचाही समावेश आहे. आता बालसुब्रमण्य यांची प्रकृती स्थिर असून करोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे समोर आले आहे. सध्या बालसुब्रमण्म यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एस. पी. बालसुब्रमण्यम हे ७४ वर्षांचे आहेत. त्यांनी स्वत: फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत करोनाची लागण झाल्याचे सांगितले. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले होते.
