रंगभूमीवर रंगलेला प्रयोग असेल किंवा जाहीर कार्यक्रमात दंग झालेले प्रेक्षक असतील. जरा कुणाच्या मोबाइलची रिंग खणखणली की उपस्थित सगळ्यांचाच रसभंग होतो आणि सगळ्यांच्या नजरा कुणाचा मोबाइल वाजतो आहे त्याचा शोध घेऊ लागतात. कुठल्याही कार्यक्रमांमध्ये बैठकीत मोबाइल वाजू नये म्हणून तो सायलण्ट मोडवर ठेवायला पाहिजे ही साधी गोष्ट काटेकोरपणे पाळली जात नाही. मग एकाच्या फोनमुळे सगळ्यांनाच त्रास होतो. मालिकांच्या सेटवरसुद्धा ही सवय सगळ्यांना लागावी म्हणून एका मोठय़ा प्रॉडक्शन हाऊसने नामी युक्ती लढवली आहे.
शशी सुमित प्रॉडक्शन ही छोटय़ा पडद्यावर गाजलेली नामांकित अशी निर्मिती संस्था आहे. आपल्या मालिकांच्या सेटवरही चित्रीकरण सुरू असताना मोबाइल फोन वाजल्याने व्यत्यय येऊ नये यासाठी सगळ्यांना मोबाइल्स सायलण्ट मोडवर ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. जो कलाकार, तंत्रज्ञ अगदी निर्मात्यांपैकी कुणाचाही फोन वाजला तर त्याला शिक्षा करण्यात येणार आहे. सध्या तरी या नियमाची सुरुवात ज्याचा फोन वाजला त्याने संपूर्ण युनिटला जेवण द्यायचे इथपासून करण्यात आली आहे. या नियमाचा पहिला फटका या प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा आर्यला बसला आहे.  शशी सुमित प्रॉडक्शनची ‘ड्रीमगर्ल : एक लडकी दिवानी सी’ ही मालिका लाइफ ओके वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेत आयेशा ही भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा आर्यला सेटवर फोन वाजल्यामुळे सगळ्या युनिटला जेवण द्यावे लागले. एका महत्त्वाच्या फोनची वाट पाहण्याच्या नादात श्रद्धा फोन सायलण्ट मोडवर ठेवायला विसरली. तिचा तो महत्त्वाचा कॉल आलाही आणि त्यामुळे शिक्षाही झाली. यानंतर काहीही झाले तरी पहिल्यांदा फोन सायलण्ट मोडवर ठेवून कामाला सुरुवात करायची अशी सवय आपण लावून घेतली आहे, असे श्रद्धा आर्यने सांगितले.
सेटवर सगळ्या कलाकार, तंत्रज्ञांना शांतपणे काम करता यावे, चित्रीकरणादरम्यान सेटवर एका शिस्तीत आणि व्यवस्थितपणे काम पार पाडावे यासाठी कॉपरेरेट कंपन्यांप्रमाणे काही नियम अवलंबिणे असा आमचा विचार होता. मोबाइल फोन सायलण्ट मोडवर असणे ही कामाची गरज असल्याने त्याबाबत आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. मात्र याबद्दल कलाकारांनी कुठलीही तक्रार केलेली नाही याचा आनंद वाटतो, असे मत प्रॉडक्शन हाऊसचे सुमित एच. मित्तल यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stars keeping mobile on silent at the time of shooting
First published on: 14-04-2015 at 06:18 IST