संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये मंगळवारी महापुराचा हाहाकार उडाला. या दोन्ही शहरांतून अनुक्रमे 51 हजार 785 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नागरिक संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य नाही वाटत, असं म्हणत अभिनेता सुबोध भावेनं त्याच्या नाटकाचे प्रयोग रद्द केले आहेत.

कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगली येथे आजपासून सुबोधच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे प्रयोग सुरू होणार होते. मात्र पुरामुळे सुबोधने हे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी आजपासून सुरू होणारे अश्रूंची झाली फुलेचे प्रयोग रद्द करत आहोत. तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य वाटत नाही. आधी तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, सुरक्षित व्हा. नाटकाचा प्रयोग घेऊन आम्ही परत येऊ,” असं तो म्हणाला.

त्याचसोबत पूरग्रस्तांना कोणती मदत हवी असेल तर ती करण्याचं आश्वासनंही त्याने या व्हिडीओत दिलं आहे. दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लष्कर, नौदल आणि हवाईदलाची मदत घेतली जात आहे.