मराठी चित्रपटसृष्टीत काही विषय अगदी शिताफीने हाताळत या कलाविश्वात अनेकजण मोलाचं योगदान देत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता सुमीत राघवन. आव्हानात्मक, प्रभावी आणि तितक्याच लक्षवेधी व्यक्तीरेखा रुपेरी पडद्यावर साकारणारा हा अभिनेता आता लवकरच एका महत्त्वाकांक्षी अभिनेत्याच्या रुपात दिसणार आहे. मुख्य म्हणजे या व्यक्तीरेखेच्या रुपात सुमीतने एक मोठी जबाबदारीच हाती घेतली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण, आपल्या अभिनयाने नटसम्राट ठरलेल्या डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका तो साकारणार आहे.
एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने डॉ. लागू यांची भेट घेते वेळची काही छायाचित्रंही पोस्ट केली आहेत. ‘एवढ्या मोठ्या माणसाचे जीवन साकारणे म्हणजे तारेवरची कसरत होती. शूटींगच्या आधी डॉ.लागूंचे आशीर्वाद मिळाले हे माझं भाग्यच म्हटलं पाहिजे. निखिल साने आणि माझा दिग्दर्शक अभिजीत देशपांडेचे सुद्धा मनापासून आभार कारण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. प्रचंड उत्सुकता आणि तितकीच धाकधूक होतेय.. कुठेही उथळ किंवा त्यांची नक्कल माझ्याकडून होता कामा नये याची पूर्ण दक्षता बाळगली आहे…’, असं सुमीतने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या इतक्या मोठ्या कलाकाराची व्यक्तीरेखा साकारण्याचं हे शिवधनुष्य आता सुमीत पेलू शकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘भेदक नजर,शांत पण काळजाच्या आरपार जाणारा आवाज. स्थितप्रज्ञ , मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट!’, या अलंकारिक शतब्दांमध्ये त्यांनी डॉ. लागू यांची ओळख करुन देत आपण डॉ. श्रीराम लागू साकारत असल्याचं स्पष्ट केलं. ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोटेक्टमधून त्याचं हे रुप पाहता येणार आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०१८ला प्रदर्शित होणार आहे.
वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा
१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनेता म्हणून उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरित्या बदलून टाकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.