बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन गेल्या बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. अनेक वेळा ती तिच्या मुलींसोबतचे फोटो शेअर करत असते. सुश्मिताने २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं. विशेष म्हणजे सुश्मिता तिच्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम करत असून तिच्या धाकट्या लेकीने लिहिलेल्या पत्रामुळे सुश्मिताच्या डोळ्यात अश्रू आले.
सुश्मिताने सोशल मीडियावर तिच्या १० वर्षांच्या चिमुकल्या आलिशाचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये आलिशा अडॉप्शनवर लिहीलेलं एक पत्र वाचताना दिसत आहे. “हे पत्र वाचून आलिशाने माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या”, असं कॅप्शन सुश्मिताने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, ज्यावेळी रेने आणि आलिशा वयाची १८ वर्ष पूर्ण करतील त्यावेळी त्या दोघींचीही त्यांच्या खऱ्या आई-वडिलांसोबत एकदा भेट घडवून देणार असल्याचं सुश्मिताने एका मुलाखतीत सांगितलं. तसंच त्यासाठी कायद्याची मदत लागली तरी घेणार असल्याचं तिने यावेळी सांगितलं होतं.