माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची लव्ह लाइफ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. तिचे प्रत्येक प्रियकर आणि त्यांच्यासोबतचे तिचे आयुष्य नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. नुकतंच सुश्मिताचे प्रियकर रितीन भसीनसोबत ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण त्यानंतर केम्स कॉर्नरच्या पार्टीमध्ये दोघांमध्ये फार जवळीक दिसून आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुश्मिता आणि रितिक एकमेकांसोबत फारच कम्फर्टेबल होते. या पार्टीत त्यांच्यासोबत बॉलिवूडमधील इतर कपल्सही आले होते. पण त्या सर्वांपेक्षा प्रसारमाध्यमांचं सर्वात जास्त लक्ष होतं ते सुश्मिता आणि रितिकवर. गेल्या चार वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच ते लग्न करणार असल्याच्या चर्चाही होत्या. पण या सगळ्यात दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आल्यामुळे सुश्मिताच्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला होता.

काही दिवसांपूर्वी झहीर खान आणि सागरिका घाडगे यांच्या लग्नात दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. या लग्नात दोघांना लवकरात लवकर लग्न करण्याचा सल्लाही त्यांच्या मित्रांनी दिला होता.

याआधी सुश्मिता सेनने विक्रम भट्ट, रणदीप हुडा, वसीम अक्रम आणि बंटी सचदेवा यांच्याबरोबर डेटिंग केले आहे. अखेर सुश्मिताला रितिकसोबत पाहून तिच्यावर नितांत प्रेम करणारा माणूस अखेर भेटला असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आता हे दोघं खरंच एकमेकांसोबत राहतील का, की त्यांची प्रेमकथाही आधीच्या प्रियकरांसारखीच अर्ध्यावर संपेल हे तर येणारा काळच सांगू शकेल.