मूर्ख असणे हा काही गुन्हा नाही असं म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करने क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांची पाठराखण केली आहे. हार्दिक आणि के एल राहुल यांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांप्रती केलेल्या हीन वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचसंदर्भात स्वराने ट्विट केले आहे. आपल्या देशाच्या कोर्टाकडे दुसरे काही काम नाही का, अशा शब्दांत तिने टीकासुद्धा केली आहे.

‘मी कट्टर स्त्रीवादी आहे. पण खरंच मूर्ख असणे हा काही गुन्हा नाही आणि आपल्या देशाच्या कोर्टाकडे बाकी काही काम नाही का,’ असं स्वराने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हार्दिक आणि के एल राहुल यांना शिक्षा ठोठावण्यासाठी एका तपास अधिकाऱ्याची (ओम्बड्समन) नियुक्ती करण्याची आवश्यकता भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासक समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालय आता पुढील आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. पी. एस. नरसिंहा हे सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भात मदत करणार आहेत. ते रुजू झाल्यानंतर या प्रकरणाला गती मिळेल. तोपर्यंत राहुल आणि पंड्या यांच्यावरील टांगती तलवार कायम राहणार आहे.