छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे चाहते आहेत. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर.

आपल्या अभिनय आणि विनोदी शैलीने प्रसादने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रसादचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर प्रसाद मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आता प्रसादची नवी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. प्रसादने मुंबई विमानतळावरील हास्यजत्रा टीमचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा- “किरण्या… हल्ली तू …” किरण मानेंना पाहताच अशोक सराफ काय म्हणाले? भेटीचा फोटो व्हायरल

फोटोमध्ये वनिता खरात, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप पोझ देताना दिसत आहेत. फोटोवरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सगळेच कलाकार उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत प्रसादने लिहिले, “महाराष्ट्राची हास्यजत्रा चालली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर.” प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेची टीम सिंगापूर दौऱ्यावर गेली होती. सिंगापूर दौऱ्यावर कलाकारांबरोबर त्यांचे कुटुंबीयसुद्धा होते. हास्यजत्राच्या कलाकारांनी सिंगापूरमधील प्रसिद्ध स्थळांना भेटीही दिल्या. या दौऱ्यादरम्यान फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हास्यजत्रेचे कलाकार सिंगापूरमध्ये मजा-मस्ती करताना दिसून आले होते.