छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. या मालिका घराघरांत पाहिल्या जातात त्यामुळे लोकप्रिय मालिकांमधील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षक लगेच ओळखतात. अभिनेता शशांक केतकर हे मालिकाविश्वातील मोठं नाव. आजवर त्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे शशांकचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या अशाच काही चाहत्यांना तो नुकताच भेटला. या भेटीचा खास अनुभव शशांकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘कालाय तस्मै नम:’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’ ते अगदी सध्या सुरू असलेली ‘मुरांबा’ या सगळ्याच मालिकांमधून शशांकने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. एकदा तरी त्याला भेटता यावं अशी त्याच्या हजारो चाहत्यांची इच्छा असते. रविवारी सकाळी अशाच काही सफाई महिला कर्मचाऱ्यांनी शशांकला अगदी लगेच ओळखलं. या भेटीचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “ट्रोलिंगमुळे किती गोष्टी…”, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेची चिन्मय मांडलेकरने घेतली रजा, मृण्मयी देशपांडे म्हणाली…

“मी एक कलाकार म्हणून नेहमी हेच म्हणतो, मायबाप प्रेक्षक आहेत म्हणून मी आहे. माझ्यासाठी माझा प्रेक्षक सगळ्यात महत्वाचा. प्रेक्षकांना काम, व्यक्तिरेखा आवडते म्हणून ते त्यांच्या मनात, घरात स्थान देतात. आज, रविवार सकाळचा एक गोडं अनुभव. आपलं शहर स्वच्छ राहावं यासाठी रोज रस्ता झाडून घेणाऱ्या या ताई… कित्ती गोड हसल्या मला बघून… त्यांच्या चेहऱ्यावरचं निरपेक्ष हसू पाहून मी ही आपसूक हसलो… आनंदलो. देवा हे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नकोस.” अशी पोस्ट शेअर करत शशांकने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “चित्रपट सपशेल आपटला अन्…”, ‘त्या’ कठीण काळात अवधूत गुप्तेला कोणी दिली साथ? पहिल्यांदाच केला खुलासा

दरम्यान, शशांक केतकरने या व्हिडीओमध्ये संबंधित महिलांना त्यांची नावं देखील विचारली होती. तसेच असंच प्रेम कायम ठेवा असं त्याने आपल्या चाहत्यांना सांगितलं. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.