दी अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर भारतातील करविषयक कायदे मोडल्याचा आरोप असतानाच आता त्यांच्यावर ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटला फसवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमध्ये न्यायालयात यासंदर्भात दावा दाखल करण्यात आला आहे. कलाकृती ब्रिटिश आहे की नाही यावर शिक्कामोर्तब करणारी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युट ही संस्था आहे. फिल्म ब्रिटिश असेल तर 25 टक्क्यांपर्यंत करसवलत मिळते. त्यासाठी चित्रपटाच्या खर्चापैकी किमान 10 टक्के खर्च इंग्लंडमध्ये झालेला असावा लागतो आणि निर्माती कंपनी इंग्लंडच्या कॉर्पोरेशन टॅक्सप्रणालीमध्ये असावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हीआरजी डिजिटल कॉर्पोरेशन, बाँबे कास्टिंग टॅलेंट मॅनेजमेंट प्रा.लि., बोहरा ब्रॉस ग्रुप फर्म व होरायजन आउटसोर्स सोल्युशन्स यांनी गोलगोल फिरवणारे व्यवहार दाखवून बाँबे कास्टिंग टॅलेंट मॅनेजमेंट प्रा.लि.नं अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरसाठी जास्त पैसे गुंतवल्याचे दाखवल्याचा दावा इंग्लंडमधल्या स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. बोहरा ब्रदर्स एक निर्माते असून करसवलत मिळवण्यासाठी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखर सम्राट रत्नाकर गुट्टे यांचे पूत्र विजय गुट्टे हे व्हीआरजी डिजिटलच्या संचालक मंडळावर नोव्हेंबर 2018 पर्यंत होते. डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटीआयनं 2 ऑगस्ट रोजी गुट्टे यांना अटकही केली होती व ते आता जामिनावर बाहेर आहेत.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गुट्टे यांनी निर्मात्यांनी योग्य ती प्रक्रिया पार पाडली असून विश्वासार्ह कागदपत्रेच सादर करून करसवलत मागण्यात आली होती असा दावा केला आहे. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्युटनं करसवलतीबाबतची माहिती देण्यास गुप्ततेचं कारण देत असमर्थता दर्शवली आहे.
भारतामध्येही व्हीआरजी डिजिटलविरोधात खोटी बिलं बनवल्याचा तसेच सरकारकडून चुकीच्या पद्धतीनं करपरतावा मागितल्याचा आरोप आहे. तर व्हीआरजी डिजिटलविरोधात कुठलाही खटला नसल्याचं गुट्टे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

कुठल्याही प्रकारे गोलगोल व्यवहार झालेला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सरकारनं परिस्थितीचा चुकीचा अर्थ काढल्याचा व आपण आर्थिक घोटाळ्यात सहभागी असल्याचा चुकीचा आरोप केल्याचा त्यांचा दावा आहे. किंबहुना या घोटाळ्यामधले आपण एक पीडित असून आपलेच 34 कोटी रुपये घेऊन होरायझननं पोबारा केल्याचा दावा गुट्टे यांनी केला आहे. होरायझन आउटसोर्सच्या विरोधात आपण 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात, मला अटक करण्यात आली तरी मला आनंद आहे कारण इंग्लंडमध्ये असाच तपास केला जातो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accidental prime minister director tax fraud charges in uk
First published on: 08-01-2019 at 14:06 IST