रेश्मा राईकवार
माणसं पुढे का सरकत नाहीत? अनेक गोष्टींवर ती रेंगाळलेली असतात? काय शोधत असतात नेमकं? आजच्या धावपळीच्या जगात करिअरच्या पाठी धावणारे अनेक तरुण-तरुणी एका विचित्र जीवनशैलीत अडकले आहेत, यात शंका नाही. रात्री काम करणाऱ्यांना दिवस दिसत नाही आणि दिवसा काम करणाऱ्यांना रात्र कार्यालयाच्या चार भिंतींतच अनुभवता येते. पण या सगळय़ातून बाहेर पडून माझं प्रेम, माझी स्वप्नं, माझी माणसं आणि याहीपलीकडे मला नेमकं काय हवं आहे, याची उत्तरं मिळवावीच लागतात. या सगळय़ाची कुठलीच रूढ उत्तरं नाहीत कोणाकडे.. पण आपापल्या पध्दतीने आपलं असणं शोधणाऱ्या वेगवेगळय़ा चवीच्या माणसांची गोष्ट म्हणजे मीडियम स्पाईसीह्ण.
गेली कित्येक र्वष प्रायोगिक रंगभूमीवर आपली ठळक ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक मोहित टाकळकर याचा मीडियम स्पाईसीह्ण हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाचा विषय, त्याची मांडणी ही निश्चितच इतर चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. वास्तवदर्शी चित्रण असलेल्या या चित्रपटाचा नायक निस्सीम हा एक उत्तम शेफ आहे. त्याच्या नजरेतून दिग्दर्शक आपल्याला त्याच्या आजूबाजूची माणसं दाखवत राहतो. मुळात दिग्दर्शक म्हणतो तसं ही माणसांची गोष्ट आहे. ती निस्सीमची आहे, निस्सीमच्याच हॉटेलमध्ये त्याची बॉस असलेली शेफ गौरीची आहे, निस्सीमला आवडणारी प्राजक्ता, मूळचा इंदौरचा असलेला त्याचा सहकारी शुभंकर, निस्सीमचे आई – वडील अशा प्रत्येकाची गोष्ट आहे. त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, यश-अपयश या समांतर कथांबरोबर निस्सीमची स्वत:चीही कथा उलगडत जाते. शेफ असल्यामुळे हॉटेलच्या मागची म्हणजे तिथल्या स्वयंपाकघरातील रोजची गडबड – धांदल, भाज्या चिरण्यापासून पदार्थ सजवण्यापर्यंतच्या रोजच्या धांदलीत त्यांचं रोजचं आयुष्य, एकमेकांची सुख-दु:खही चवीने वाटून घेतली जातात. मात्र या धांदलीत स्वत:च्या बाबतीतले निर्णय घेणं अनेकांना अवघड जातं. मग निस्सीमचा प्रेमाचा शोध असो की शुभंकरचं स्वप्न.. प्रत्येकजण आपापला पैसा शोधत आनंदाने जगण्याच्या प्रयत्नात आहे.
मीडियम स्पाईसीची कथा लेखिका इरावती कर्णिकची आहे. तिच्या सगळय़ाच व्यक्तिरेखा अगदी ठळक आणि स्पष्ट असतात. विशेषत: स्त्री व्यक्तिरेखा या खूप वास्तव उतरलेल्या असतात. इथे आपल्या लग्नाविषयी ठाम विचार करणारी, पटकन निर्णय घेणारी प्राजक्ता आहे, आपल्याला काय हवं आहे याबाबत स्पष्टता असलेली गौरी आहे, निस्सीमची बहीणही तितकीच व्यवहारी आहे आणि निस्सीमची आई – आत्या या दोन टोकाच्या व्यक्तिरेखा असल्या तरी त्या दोघीही आपापल्या पध्दतीने कर्तबगार, खंबीर बाण्याच्या आहेत. या स्त्री व्यक्तिरेखाच नाही तर चित्रपटातील एकूण एक पात्रं ही आपल्याला रोजच्या आयुष्यात आपल्या नात्यात नेहमी पाहायला मिळतील अशी आहेत. इरावतीच्या लेखणीतून उतरलेली ही माणसं त्याच अस्सलतेने, त्याला कुठलाही दिखाऊपणाची पार्श्वभूमी न देता पडद्यावर नेटकेपणाने उतरवण्याचं श्रेय हे दिग्दर्शकाला द्यायला हवं. चित्रपट हा शब्दबंबाळ नाही, त्याची लय संथ आहे, त्यामुळे नेहमी वेगवान घडामोडी पाहण्याची सवय असलेल्यांना हा एकूणच प्रवास रेंगाळल्यागत वाटण्याची शक्यता आहे. मात्र थोडा विचार केला तर खऱ्या आयु्ष्यातही आपण असेच तर असतो हे लक्षात येतं. अनेकदा संधी असूनही आपण मनातील गोष्टी बोलत नाही, एखादी व्यक्ती आवडण्यापुरतीच राहते, तर कित्येकदा घाईत चुकीची निवड करून मग ते प्रेम असो वा मनाजोगती नोकरी.. आयुष्य पुढे ओढत राहतो. या अशा वेगवेगळय़ा रंगाच्या-ढंगाच्या माणसांना एकत्र आणत मोहित टाकळकर यांनी मीडियम स्पाईसीह्णची कथा रंगवली आहे.
कलाकारांची निवड ही उत्तम जमलेली बाजू. त्यामुळे कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखांबाबतचे प्रयोग इथे कमालीचे यशस्वी ठरले आहेत. सईच्या लुकपासून देहबोली, अभिनयापर्यंत एक वेगळाच सुंदर अनुभव इथे गौरी म्हणून पाहायला मिळतो. पर्ण पेठे, सागर देशमुख हेही त्यांच्या नेहमीच्या प्रतिमांपेक्षा वेगळे जाणवतात. नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी या दोघांनाही एकत्र अनुभवणं हाही सुंदर अनुभव आहे. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण सगळे घटक योग्य पद्धतीने एकत्र आणत केलेला ‘मीडियम स्पाईसी’ हा वेगळा प्रयोग आहे.
मीडियम स्पाईसी
दिग्दर्शक – मोहित टाकळकर
कलाकार – ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, रवींद्र मंकणी, नीना कुलकर्णी, सागर देशमुख, नेहा जोशी, अरुंधती नाग, पुष्कराज चिरपुटकर.