रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या टीव्हीवरील कार्यक्रमाने २१ वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॉलिवूडमधील आघाडीचे तीन खान सलमान खान, शाहरूख खान आणि आमीर खान एकत्र येणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून माध्यमातून येत होत्या. तिन्ही खान एकत्र येणार म्हटल्यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण होणे अपरिहार्य आहे. हा योग काल मंगळवाच्या रात्री प्रत्यक्षात आला. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमाने २१ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने ‘आप की आदालत’च्या खास भागाचे मंगळवारी रात्री नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर चित्रीकरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. परंतु, सलमान खान, शाहरूख खान आणि आमीर खान या खानत्रयीच्या एकत्रित उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एकाच वेळी मंचावर उपस्थित असलेले आमीर, शाहरूख आणि सलमान खान हसतखेळत अतिशय सहजपणे वावरताना कार्यक्रमाच्या ठिकाणी काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये दृष्टीस पडतात. बॉलिवूडमधील या आघाडीच्या तीन खानांना एकत्र पाहण्याची इच्छा त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनात अनेक वर्षापासून घर करून होती. रजत शर्मा यांनी हा करिष्मा करून दाखविला असून, कलर्स वाहिनीचे सीईओ राज नायक यांनी कार्यक्रमाचे छायाचित्र टि्वटवर पोस्ट केले आहे.