निर्माते-कलादिग्दर्शकांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यात डॉक्टर्स आणि रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी कायदा झाला. त्याच धर्तीवर मनोरंजन उद्योगाला संरक्षण देणारा कायदा व्हावा, तसेच बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या धर्तीवर मनोरंजन उद्योगातील कामगारांसाठीही एक कल्याणकारी मंडळ सरकारने स्थापन करावे आणि फिल्मसिटीतील व मनोरंजन क्षेत्राचे काम चालणाऱ्या परिसरात त्यासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निर्माते नितीन वैद्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीत के ली.

मनोरंजन क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी चित्रीकरणात अडथळे आणत असल्याने राजू साप्ते यांनी आत्महत्या के ल्याच्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी व त्यानिमित्ताने सिनेसृष्टीत सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीबाबत दाद मागण्यासाठी कलादिग्दर्शक -निर्माते आदींनी बुधवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, निर्माते नितीन वैद्य, शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर, निर्माते जे. डी. मजेठिया, कलादिग्दर्शक संघटनेचे रंगराव चौधरी, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, फिल्मसिटीच्या संचालक मनीषा वर्मा आदी यावेळी उपस्थित होते. सेटवर वा चित्रीकरण स्थळी येऊन युनियनचे पदाधिकारी कशारितीने त्रास देतात, याची सविस्तर माहिती निर्माते-कलादिग्दर्शकांनी गृहमंत्र्यांना दिली.