बॉलीवूडचा नवअभिनेता टायगर श्रॉफ हा व्हिडिओद्वारे पॉप किंग मायकल जॅक्सनला मानवंदना देणार आहे. मायकल जॅक्सनच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त तो ही योजना करत आहे.
२४ वर्षीय अभिनेता टायगर श्रॉफ हा जॅक्सनचा चाहता असून, त्याला नृत्याची प्रेरणाही त्याच्यापासूनच मिळाली आहे. तो माझे प्रेरणास्थान असून, माझे नृत्य शिकण्यामागचे कारणही तोच आहे. गेली काही वर्षे ही कल्पना माझ्या डोक्यात होती. पण, आता तिला अमलात आणायचे मी ठरवले, असे टायगर म्हणाला. टायगरने त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याच्याच ‘हिरोपन्ती’ चित्रपटातील व्हिसल बाजा आणि मायकलच्या ‘थ्रिलर’ अल्बममधील बिली जीन या गाण्याचे रिमिक्स केले आहे. सध्या टायगर व्हिडिओचे चित्रीकरण करण्यासाठीच्या तालमीमध्ये व्यस्त आहे. टायगरचाच मित्र या व्हिडिओचे दिग्दर्शन करणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो प्रदर्शित करण्यात येईल. यात हा नवअभिनेता मायकलची प्रसिद्ध मूनवॉक स्टेपही करताना दिसेल. २५ जून २००९ साली जॅक्सनचा मृत्यू झाला होता.