‘क्वीन’, ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर कंगना रणौत आता ‘सिमरन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलिज झाले असून टीझर उद्या (१५ मे रोजी) लाँच होणार आहे. त्यामुळे चित्रपटातील  कंगनाच्या भूमिकेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

आपल्या दमदार अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिमरन’ चित्रपटाची मागील वर्षभरापासून चित्रपट क्षेत्रात चर्चा होती. हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘सिमरन’ चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. तर टी सीरिजचे भूषण कुमार आणि शैलेश सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर ‘सिमरन’ चित्रपटाचा एक पोस्टर ट्विट केले आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली कंगना आपल्याला पहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि कंगनाचा या चित्रपटातील  लूक कसा असेल याविषयी कमालीची उत्सुकता रसिकांमध्ये  निर्माण झाली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कंगनाने या चित्रपटासाठी देश विदेशात काही कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला होता. चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी ही तयारी करत असल्याचेही तिने याआधी सांगितले होते.

‘सिमरन’ या एका महत्त्वाकांक्षी मुलीभोवती चित्रपटाची कथा फिरणार आहे. अनिवासी भारतीय गुजराती मुलीच्या भूमिकेत ती दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण अटलांटा येथे झाले आहे. यामध्ये तिच्यासोबत सोहम शाह मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.  कंगना यापूर्वी तिच्या ‘रंगून’ या चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला होता.  त्यामुळे आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाकडून तिला मोठ्या अपेक्षा असतील.