एखाद्या कलाकाराने गाजवलेलं नाटक पुनश्च रंगभूमीवर आणताना मोठीच जोखीम असते. विशेषत: दिलीप प्रभावळकरांसारख्या चतुरस्र नटाने आपली नाममुद्रा उमटविलेलं नाटक करताना तर विशेषच. आशय प्रॉडक्शननिर्मित ‘वासूची सासू’ पाहायला जाताना हाच विचार मनात घोळत होता. पण तरीही कोऱ्या मनानं नाटक पाहायचं ठरविलं आणि गंमत म्हणजे प्रणव रावराणेंच्या ‘सासू’ने धमाल हसवणूक केली!
मुळात हे फार्सिकल कॉमेडी नाटक! एका थापेतून उद्भवणाऱ्या समस्येवर उतारा म्हणून दुसरी थाप मारणं, त्यातून नस्तं झेंगट उभं राहिल्यावर तिसरी थाप मारणं. अशानं बुडत्याचा पाय आणखीन खोलात जाणार! हेच ‘वासूची सासू’ मध्यवर्ती सूत्र!
साठी पार केलेल्या अण्णांची छाती सलमान खानसारखी पीळदार व्हावी म्हणून त्यांची हुकूमशहा बायको हटून बसते. त्यासाठी घरात पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या वासूला त्यांचा रोज सकाळ-संध्याकाळ व्यायाम घेण्याची आणि वेटलिफ्टिंग वगैरे करवून घेण्याची जबाबदारी ती सोपविते. पाप्याचं पितर असलेले आणि बायकोच्या नवनव्या ‘झटक्यां’नी आयुष्यभर संत्रस्त असलेले अण्णा, आता या वयात आपण सलमान कसे बनणार, या फिकिरीनं भलतेच कावतात. पण कजाग बायकोसमोर त्यांचं काय्यक चालत नाही. वासूलाही पेइंग गेस्ट म्हणून त्या घरात टिकायचं असल्याने तोही नाइलाजानं अण्णांना ‘सलमान’ करण्याची जबाबदारी निमूटपणे स्वीकारतो, पण अण्णांच्या बायकोची पाठ फिरली की मात्र ते व्यायाम-बियामाला चक्क टांग मारतात. अण्णांचा मुलगा किशोर आई-बापाकडून फायदे लाटण्यासाठी वेळ पाहून आलटून पालटून एकेकाची बाजू आपल्या सोयीनं घेतो.
अशात वासूची प्रेयसी शीतल त्याचं घर बघायला येणार असते. अण्णांची बायको घरी असताना ती येणं म्हणजे सत्यानाश ठरलेलाच. तेव्हा तिला घराबाहेर कटवायचं कसं? अण्णा वासूला एक मार्ग सांगतात. त्यानुसार कसंबसं वासू तिला सिनेमाला पाठवितो, पण मग शीतल येणार म्हणजे ऑफिसला दांडी मारणं आलं. आजवर वासूनं ऑफिसात रजेसाठी इतक्या थापा मारलेल्या असतात, की त्याला आता नवं कारण सापडणं कठीण. अण्णांच्या सुपीक डोक्यातून आयडियाची कल्पना निघते. वासूनं आपली सासू मेल्याचं सांगून रजा मिळवायची! वासूला या थापेतले संभाव्य धोके लगेचच लक्षात येतात, पण अण्णांच्या आग्रहापायी तो शेवटी तीच थाप ठोकतो.
मग व्हायचा तो घोटाळा होतोच!
शीतल वासूचा फोन लागत नाही म्हणून त्याच्या ऑफिसला फोन लावते, तर तिला ‘वासूची सासू’ गेल्याचं कळतं. म्हणजे वासूनं आपल्याला चक्क पसवलंय.. त्याचं आधीच लग्न झालेलं आहे. या फसवणुकीनं पिसाटलेली शीतल वासूच्या घरी येते आणि त्याला चांगलंच फैलावर घेते. शेवटी वासू कशीबशी तिची समजूत काढतो आणि वस्तुस्थिती समजावून सांगतो तेव्हा कुठं ती निवळते. पण आता आणखीनच वेगळं खटलं उभं राहतं. वासूच्या ऑफिसमधले त्याचे सहकारी आणि त्याचे बॉस त्याच्या सासूच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरी यायला निघालेले असतात. आता आली का पंचाईत! आपलं भांडं फुटणार, थाप उघड होणार आणि आपली नोकरी जाणार, यात वासूला आता शंका उरलेली नसते. त्याचे हात-पायच गळतात. अण्णांच्या नादी लागल्यानं आपल्यावर ही वेळ ओढवली म्हणून तो त्यांना दूषणं देऊ लागतो. अण्णा त्याला समजवायचा प्रयत्न करतात. ‘मीच आता यातून काहीतरी मार्ग काढतो’, म्हणतात आणि त्यांना आयडिया सुचते. कुणाला तरी तात्पुरती वासूची सासू म्हणून मयतासारखं पडून राहायला सांगायचं. वासूचे ऑफिसातले लोक त्याचं सांत्वन करून निघून गेले की, ‘नाटक’ खतम!
पण असं प्रेत बनायला कोण स्त्री मिळणार? तीही साठीच्या पलीकडची! मग असं करावं का? एखाद्या पुरुषालाच साडी नेसवून वासूची सासू म्हणून झोपवलं तर..? अण्णा आपली आयडिया सगळ्यांना सांगतात.
मात्र, ‘असा’ पुरुष तरी कुठून शोधणार? आणि कोण या भूमिकेला तयार होणार?
आणि.. वासूची टय़ूब पेटते : अण्णांनाच साडी नेसवून ‘सासू’ केलं तर..?
पण अण्णा या कल्पनेला कडाडून विरोध करतात. मग काय होतं?
प्रदीप दळवी लिखित ‘वासूची सासू’ ही अशी अनेक घोटाळ्यांची धमाल मालिका आहे. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी काळानुरूप त्यात काही बदल केले आहेत; जेणेकरून हे नाटक फ्रेश वाटावं. त्यांनी सर्वात मोठी जोखीम घेतली आहे ती प्रणव रावराणे यांना ‘वासूची सासू’च्या भूमिकेत उभं करण्याची! प्रणव रावराणे यांचं व्यक्तिमत्त्व आणि अंगयष्टी पाहता ‘वासूची सासू’ म्हणून त्यांना प्रमुख भूमिकेत उभं करण्यात प्रचंड धोका होता; परंतु दिग्दर्शक मंगेश कदम यांनी त्यांच्या हरहुन्नरी अभिनयपटुत्वावर विश्वास टाकून हा धोका पत्करला आहे आणि प्रणव रावराणेंनीही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरविला आहे. आपल्या निसर्गदत्त उणिवांचाच वापर करीत त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे आणि समर्थपणे पेललंदेखील आहे. हडकुळे अण्णा आणि साजिरी सासू या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी अक्षरश: धुमशान घातलं आहे. स्लॅपस्टिक कॉमेडीचं उत्तम अंग त्यांना आहेच. त्याचबरोबर विनोदाचं अचूक टायमिंग, शब्दप्रधान विनोद आणि देहबोली यांच्या धमाल मिश्रणातून त्यांनी नाटक सतत हसतं-हसवतं ठेवलं आहे, पौर्णिमा अहिरे-केंडे यांनाही विनोदाची उत्तम जाण आहे. त्यांनीही अण्णांच्या कजाग बायकोची भूमिका फर्मास वठवली आहे. वासूच्या ऑफिसातले पारसी सहकारी उपेंद्र शेटे यांनी पारशांच्या निरागसतेसह अर्कचित्र शैलीत साकारले आहेत. एकाच प्रवेशात ते भाव खाऊन जातात. विक्रम गायकवाड यांनी थापेबाज वासूची तारांबळ छान दाखवली आहे. दारू प्यायल्यानंतर ‘नॉर्मल’ होणारा बंडू विनोद गायकरांनी झक्कास रंगविला आहे. स्वप्नील फडकेंचा अतिउत्साही किशोरही आपल्या वाटय़ाचे हशे वसूल करतो. परी तेलंग यांनी अतिशयोक्तीपूर्ण विनोदाची कास धरली आहे. त्यामुळे त्यांची शीतल सुरुवातीला खटकली, तरी पुढे ती ‘नॉर्मल’ होते. श्रद्धा पोखरणकर (ज्योत्स्ना) आणि अजित लोहार (मॅनेजर) यांनीही चांगली साथ दिली आहे. अजय पुजारेंनी उभं केलेलं घर नाटकाची मागणी पुरवणारं आहे. अशोक पत्की यांच्या पाश्र्वसंगीतानं नाटय़पूर्णतेत आणखीन भर घातली आहे. अन्य तांत्रिक बाबीही ठीक. एकुणात, प्रेक्षकांचा मस्त टाइमपास करणारं हे नाटक आहे.