अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूर हिच्याकडे सिनेमांच्या ऑफर्सची काही कमतरता नाही. या वर्षी तिने ‘पॅडमॅन’, ‘दत्त’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ या तीन सिनेमांचे चित्रीकरण केले, जे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. असे असताना तिने पुढच्या वर्षीसाठी अजून दोन सिनेमांसोबत करारही केला आहे. सोनम पुढच्या वर्षी दोन नव्या सिनेमांसाठी काम करणार आहे. पण हे दोन सिनेमे कोणते याबाबत मात्र तिने कोणतीही अतिरिक्त माहिती दिली नाही. पण ट्विटरवरील प्रश्नांना उत्तर देताना तिने सांगितले की, यावर्षी घेतलेली मेहनत पुढच्या वर्षी प्रेक्षकांसमोर येईल.
संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात सोनमची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजयच्या भूमिकेत रणबीर कपूरला पाहता येणार आहे.

दुर्गेच्या मंडपालाही क्रेझ बाहुबलीच्या माहालाची

तसेच पुढच्या वर्षी १३ एप्रिलला अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असून सॅनिटरी नॅपकीनच्या वापराचे महत्त्व यात सांगण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आर. बल्की करत आहेत.

सोनमच्या तिसऱ्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या वर्षी येणारा ‘वीरे दी वेडिंग’ हा सिनेमाही अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. सोनमची बहिण रिया कपूरची निर्मिती असलेल्या या सिनेमात सोनमसोबच करिना कपूर खान, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. तैमुरच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे करिनाच्या चाहत्यांचे या सिनेमाकडे लक्ष लागून राहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे तर झाले सोनमचे पुढच्या वर्षी प्रदर्शित होणारे तीन सिनेमे. पण तिचे पुढील दोन सिनेमे कोणते असणार याचा विचार केला असता, शशांक घोष दिग्दर्शित ‘बॅटल ऑफ बिटोरा’ या सिनेमात ती दिसू शकते. या सिनेमात ती फरहान अख्तरसोबत दिसणार असे म्हटले जाते. तसेच विधु विनोद चोप्रा यांच्या सिनेमातही सोनम कपूर दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमात विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा मुख्य अभिनेता असणार आहे.