सिनेमा, सौजन्य –
एक दहा वर्षांच्या मुलीची  सायकलसाठीच्या धडपडीची कहाणी सांगणारा ‘वजदा’ हा ऑस्करवारी करणारा पहिलाच सौदी अरेबियन चित्रपट. त्याचं चित्रीकरणंही तिथंच झालं आहे. अरबी समाजजीवन उलगडून सांगणाऱ्या या चित्रपटाचे कथालेखन व दिग्दर्शन एका स्त्रीने केले आहे.
सौदी अरेबियात सध्या चर्चेचा विषय बनलेली गोष्ट म्हणजे ‘वजदा’ हा चित्रपट. न्यूयॉर्क व लॉस एंजलिस येथे नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचे संपूर्ण चित्रीकरण सौदी अरेबियामध्ये झाले असून त्याचे कथालेखन व दिग्दर्शन हैफा अल-मन्सूर या महिलेने केले आहे.
‘वजदा’ची कथा रियाधच्या एका उपनगरातील एक दहा वर्षीय मुलगी व तिची हिरव्या सायकलसाठी चाललेली धडपड याभोवती फिरते. जेथे स्त्रियांच्या फिरण्यावर बंधने आहेत व मुलींनी सायकल चालविल्याने त्यांचे पावित्र्य धोक्यात येते असे मानले जाते अशा ठिकाणी ‘वजदा’ ही मुलगी शाळेमध्ये कुराण पाठांतर स्पर्धेमध्ये रोख रकमेचे बक्षीस मिळवून सायकल खरेदीचे स्वप्न बाळगताना दिसते. या आकर्षक व धडपडय़ा मुलीच्या नजरेतून व पेहरावातून उदा. तिचे काळे बूट, त्यावरील जांभळी लेस, निळ्या रंगाचे नेलपॉलिश, बुरखा जो तिने कधीही घेतला नाही, तसेच मिक्सटेपची आवड अशा बारीकसारीक गोष्टींतून तेथील जीवनमानाची तोंडओळख प्रेक्षकांना प्रथमच होते. यातील प्रमुख व्यक्तिरेखा वाद मोहम्मद हिने साकारली आहे.  
हैफा चित्रपटनिर्मितीविषयी सांगते की, ‘‘या चित्रपटाचे कथालेखन माझा मुलगा लहान असतानाच मी केले होते. २०१० साली मिडल इस्टमध्ये सनडान्स इन्स्टिटय़ूटच्या स्क्रीनरायटर्स लॅबमध्ये या कथेची निवड झाली. तरीसुद्धा याची निर्मिती करणे एक मोठे आव्हान होते. सरतेशेवटी मिडल ईस्टमध्ये चित्रपट बनवणाऱ्या निर्मिती कंपन्यांची एक यादी मी तयार केली. या चित्रपटाला जर्मन निर्माते गेर्हर्ड मैक्स्नर व रोमन पॉल तसेच सौदी राजपुत्र अलवालीद बिन तलाल यांची निर्मिती कंपनी रोटाना यांनी अर्थसाहाय्य केले आहे. या चित्रपटाचे बजेट कमी असूनही गुंतवणूकदारांना सौदी अरेबियात चित्रपटनिर्मिती शक्य आहे हे पटवून देता देता पाच वर्षांपेक्षाही जास्त कालावधी लागला.’’
निर्मात्यांनी दुसऱ्या अरब देशात चित्रीकरणासाठी आग्रह धरला होता. पण कथेची पाश्र्वभूमी लक्षात घेता सौदीतच त्याचे चित्रीकरण कसे उचित आहे, हे हैफाने त्यांना पटवून दिले. तिच्या म्हणण्यानुसार, संहितालेखन करताना कुठेही संस्कृती वा धर्मविरोधी भूमिका घेतली नाही. त्यामुळेच सौदी सरकारकडून चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला. पूर्ण चित्रपटात घरातील वा इस्पितळातील प्रसंग वगळता स्त्रिया व पुरुष कुठेही एकत्ररीत्या वावरताना दिसत नाहीत. कडक सामाजिक बंधनांमुळे चित्रीकरणाला सहा आठवडय़ांचा कालावधी लागला. बाह्य़ चित्रीकरण करताना हैफाला व्हॅनमध्येच बसून कलाकारांना वॉकी-टॉकीवरून सूचना द्याव्या लागायच्या. पुढे चित्रीकरणासाठी मुलींची शाळा मिळाली नाही, तेव्हा ते मुलांच्या शाळेत करण्यात आले. या सर्व निर्मितीप्रक्रियेत धर्ममरतडांची भीती सदोदित होतीच.

धाडसी पाऊल
सौदी अरेबियाचे राजा अब्दुल्लाह यांनी या वर्षी नुकताच एक वटहुकूम काढून आपल्या कायदेमंडळावर महिलांची नेमणूक करावी असे आदेश दिले आहेत. या कायदेमंडळात आतापर्यंत महिलांचा सहभाग नव्हता. तसेच  २०१५ मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. अशा धर्माधिष्ठित देशामध्ये घेतलेले निर्णय म्हणजे महिला सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक धाडसाचे पाऊलच ठरेल. कारण तेथे महिलांना अजूनही कायदेशीररीत्या वाहन चालविण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत.

सौदीमध्ये सामाजिक जीवनात बंधनं पाळणारी स्त्री आपल्या घरी मनमोकळेपणाने गायन, नृत्य करते हा त्यांच्यात होणारा बदल चित्रपटात चांगला टिपला गेला आहे. तसेच एका प्रसंगात वजदाची शिक्षिका मुलांनी केलेल्या गोंधळामुळे त्यांची खरडपट्टी काढताना म्हणते, स्त्रीचा आवाज तिचे व्यक्तिमत्त्व दर्शवितो. वजदाच्या आईचे गायन, मुलींचे हसणे-खिदळणे अशा अनेक प्रकारांनी महिलांचा आवाज चित्रपटात व्यापून राहिल्यामुळे तो लक्षवेधक होतो.     
‘‘चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा ही माझ्या भाचीवरून बेतली आहे. माझा भाऊ धर्माभिमानी व कट्टर होता. आपल्या मुलीने त्याप्रमाणे वागावे याबाबत तो आग्रही होता. हा एक धक्काच होता, कारण माझ्या जन्मगावी अनेक मुली कर्तृत्ववान व स्वतंत्र विचाराच्या होत्या.’’ हैफा सांगते.
देशात सार्वजनिक चित्रपटगृहे नसल्यामुळे लोकांना हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित व उद्युक्त करणे हे एक मोठे आव्हानच होते. हा चित्रपट डीव्हीडी व अमेरिकन प्रक्षेपण वेळेनुसार दूरदर्शनवर उपलब्ध आहे. हैफाच्या म्हणण्यानुसार कित्येक सौदी लोक आठवडय़ाअखेरीस हा चित्रपट पाहण्यासाठी बहरिन, कुवेत आणि युनायटेड अरब अमिरातीला जातात. चित्रपटाला याआधीच मोठय़ा प्रमाणात पूर्वप्रसिद्धी मिळाली आहे. एप्रिलमध्ये त्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपट प्रदर्शनावेळी जॉर्डनच्या राणी नूर उपस्थित होत्या आणि त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात ग्लोरिया स्टेनेम यांनी सहभाग घेतला होता. सौदी अरेबियाने जाहीर केले आहे की, ऑस्करसाठी हा चित्रपट पाठविण्यात येईल. हैना म्हणते, ‘‘मला कल्पना आहे की, सौदीत काही एका रात्रीत बदल होणार नाहीत. या चित्रपटामुळे नसले तरी हळूहळू योग्य दिशेने लहानसहान असे बदल होतील व याचे स्वागतच व्हायला हवे.’’
‘वजदा’ला ऑस्कर मिळेल की नाही, या दूरच्या गोष्टी आहेत, पण सौदीमध्ये एक स्त्री चित्रपट निर्मिती करते आणि तो थेट ऑस्कपर्यंत धडक मारतो हे ऑस्कर मिळवण्यापेक्षाही अधिक श्रेयस्कर आहे.
अनुवाद – संजीव उपरे
(संडे एक्स्प्रेसमधून साभार)