गेले काही महिने निवडीतील राजकारणामुळे भिजत घोंगडे पडलेल्या नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी अखेर महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. यानिमित्ताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदी प्रथमच एका महाराष्ट्रीय नाटय़कर्मीची निवड होत आहे.
देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालकपदासाठी कर्नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग, काश्मीरमधील नाटय़कर्मी अब्दुल लतिफ खटाणा आणि महाराष्ट्रातून ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे यांची नावे चर्चेत होती.
नाटय़कर्तृत्व आणि नाटय़प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव तसेच अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधील प्रशासनाचाही गेल्या दहा वर्षांचा अनुभव प्रा. केंद्रे यांच्या गाठीशी होता. त्यामुळे त्यांचे पारडे गुणवत्ता आणि अर्हतेच्या बाबतीत अन्य उमेदवारांपेक्षा निश्चितच जड होते. तरीही गेले काही महिने या निवडीसंबंधात घोळ घालण्यात येत होता. आणि आज अखेरीस प्रा. केंद्रे यांची एनएसडीच्या संचालकपदी निवड करण्यात आली.
एनएसडीचेच स्नातक असलेले प्रा. वामन केंद्रे यांनी ‘झुलवा’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘नातीगोती’, ‘चार दिवस प्रेमाचे’, म्युझिकल ‘ती फुलराणी’, ‘प्रेमपत्र’, ‘रणांगण’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘मोहनदास’ आदी अनेक गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. संस्कृत नाटककार भासलिखित ‘मध्यम व्यायोग’ हे नाटक त्यांनी प्रथम त्याच नावाने आणि नंतर आपल्या ‘रंगपीठ’ संस्थेतर्फे त्याचा ‘प्रिया बावरी’ (मराठी), ‘मोहे पिया’ (हिंदी) आणि ‘ओ माय लव्ह’ (इंग्रजी) असा त्रिभाषिक प्रयोगही एकाच कलावंतांच्या संचात सादर केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी त्यांनी ‘लडी नजरीया’, ‘जानेमन’ ही नाटके दिग्दर्शित केली आहेत. एक उत्तम नाटय़प्रशिक्षक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. राज्य शासनासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना वेळोवेळी लाभले आहेत. अलीकडेच त्यांना कला क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला होता.
गेली दहा वर्षे मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या स्थापनेपासून प्रा. वामन केंद्रे हे त्याच्या संचालकपदाची धुरा सांभाळत आहेत. या विभागाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सव तसेच जागतिक स्त्री-नाटककारांच्या परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केले आहे.
हा मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा गौरव-केंद्रे
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय)च्या संचालकपदी माझी निवड ही महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब असून या निवडीने मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा गौरव झाला आहे, अशा शब्दात वामन केंद्रे यांनी ‘लोकसत्ता’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘एनएसडी’च्या गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा संचालकपदी मराठी रंगकर्मीची निवड झाली आहे. ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब असून या पदावर माझी निवड व्हावी, अशी अनेकांची इच्छा होती.त्या सर्वाच्या इच्छेला फळ आल्याचे सांगून केंद्रे म्हणाले की, संचालकपदी निवड केल्याबद्दल ‘एनएसडी’च्या सर्व निवड समिती सदस्यांप्रतीही मी कृतज्ञ आहे. चांगले काम करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली असून या संधीचे सोने कसे करता येईल त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आपल्या देशात ‘नाटक’ या विषयात कोणाला अभ्यास, संशोधन करून विशेष प्रावीण्य मिळवायचे असेल तर दुर्देवाने तशी सोय नाही. त्यामुळे ‘एनएसडी’मध्ये नाटक या विषयातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, संशोधन याचेही प्रशिक्षण कसे मिळेल,यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.