बुहप्रतिक्षीत ‘फुकरे रिटर्न्स’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहताना तुम्हाला हसू नाही आलं तर नवलच. भोली पंजाबनही ‘फुकरे बॉईज’ अर्थात पुलकित सम्राट, वरूण शर्मा, मनज्योत सिंग आणि अली फझलवर आपला सूड घ्यायला सज्ज झाली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट ‘फुकरे’ खूप गाजला होता. आता हा ‘फुकरे’ सिनेमाचा पुढील भाग असणार आहे. सोप्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी चार मित्र काय काय करतात हे ‘फुकरे’ सिनेमात दाखवण्यात आले होते. आता ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये भोली पंजाबन तुरुंगातून सुटून परत आल्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल करताना दिसत आहे.
मृगदिप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे रिटर्न्स’च्या ट्रेलरमध्ये एकाहून एक विनोदांचा भडीमार आहे. या सिक्वलमध्ये ‘चूचा’, ‘लाली’ यांच्यातील धमाल विनोदी संवाद, मित्रांना पेचात पाडणाऱ्या मास्टर चूचाची भविष्यवाणी या गोष्टी पुन्हा नव्याने सादर करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.
कोणताही मोठा चेहरा नसतानाही ‘फुकरे’ सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने चांगली कमाई केली होती. आता ‘फुकरे रिटर्न्स’ प्रेक्षकांना तितकाच आवडतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.