दीपिका पदुकोणने आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मुख्य म्हणजे दीपिकाचे काही चित्रपट प्रेक्षकांच्या फेव्हरिट लिस्टचा भाग आहेत. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गोलियों की रासलीला- रामलीला’. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. गुजरात प्रांतातील सनेडा-रजाडी या दोन समाजांमध्ये असणारं तणावाचं वातावरण आणि त्यातून खुलणारं ‘राम-लीला’चं प्रेम याभोवती भन्साळींच्या या चित्रपटाचं कथानक फिरलं होतं.

‘रामलीला’साठी दीपिकानेही बरीच मेहनत घेतली होती. या चित्रपटात वापरली गेलेली भाषा, स्थानिक नृत्यप्रकार आणि एकंदर प्रभावीपणे हा चित्रपट मांडण्यासाठी तिच्यासह इतरही कलाकारांनी बराच घाम गाळला होता. पण, तुम्हाला माहितीये का…. बॉलिवूडच्या मस्तानीच्या वाट्याला इतकं यश देणाऱ्या या चित्रपटाच्या सेटवर एक वेळ अशीही आली होती जेव्हा दीपिकाला रडू आवरलं नव्हतं.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट लेखिका गरिमा वाहल आणि सिद्धार्थ सिंगने ‘रामलीला’च्या चित्रीकरणादरम्यानचे काही किस्से उलगडले. याच वेळी तिने दीपिकाला अश्रू अनावर झाल्याचा किस्सा सांगितला. ‘तिच्यासाठी (दीपिकासाठी) तो चित्रीकरणाचा पहिलाच दिवस होता. दीपिकाच्या दृश्याचं चित्रीकरण होणारच होत… पण, तेवढ्यातच अगदी शेवटच्या क्षणी तिच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्यात आले. तेव्हा दीपिकाला रडू आवरता आलं नाही.’ असं गरिमाने सांगितलं.

गरिमा पुढे म्हणाली, ‘दीपिकाला सहसा तिचे डायलॉग्स लक्षात असतात. पण, त्या एका बदलाचा तिच्यावर बराच परिणाम झाला. त्यावेळी संपूर्ण दिवस त्या एका डायलॉगवरच मेहनत घेण्यात आली. रामलीलामध्ये दीपिका आणि रणवीर आपल्या समाजाचे प्रमुख म्हणून जेव्हा एकमेकांसमोर येतात ते दृश्य आठवतंय का? हे तेच दृश्य आहे ज्यावेळी दीपिकाचे अश्रू अनावर झाले. मुख्य म्हणजे याच दृश्यामध्ये दीपिकाच्या अभिनयाची उत्तम झलक पाहायला मिळाली. दीपिका एक उत्तम अभिनेत्री असल्याचं यावेळी सिद्धार्थ आणि गरिमा म्हणाले.