आम आदमी पक्षाच्या (आप) स्थापनेपासून पक्षाने दिल्लीच्या राजकारणात घेतलेली उत्तुंग भरारी हा अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. एका सामान्य माणसापासून ते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत अरविंद केजरीवाल यांनी घेतलेली झेप हा संपूर्ण प्रवास एखाद्या चित्रपटात शोभावा असाच आहे. मात्र, अरविंद केजरीवालांना खरचं एखाद्या चित्रपटासाठी आणि तेही चक्क मल्लिका शेरावतबरोबर काम करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती, हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आप’च्या मागील ४९ दिवसांच्या टर्ममध्ये केजरीवाल यांच्यासमोर के. सी. बोकाडिया दिग्दर्शित ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात काम करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या चित्रपटातील पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारण्यासंदर्भात त्यांना विचारण्यात आले होते. मात्र, त्यावेळी पक्षाच्या कामात व्यग्र असल्यामुळे केजरीवालांनी ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी ही व्यक्तिरेखा साकारली.