बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. हेमा मालिनी प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेदेखील तितक्याच चर्चेत राहिल्या. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लव्हस्टोरी तर साऱ्यांनाच ठावूक आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी लग्न केलं. त्यावेळी धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलंदेखील होती. मात्र तरीदेखील हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे जर हेमा मालिनी यांचं धर्मेंद्रसोबत लग्न झालं नसतं, तर कदाचित आज त्या जितेंद्र यांच्या पत्नी असत्या.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी ज्यावेळी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला हेमा मालिनी यांच्या घरातल्यांचा सक्त विरोध होता. कारण धर्मेंद्र यांचं लग्न झालं असून त्यांना बॉबी आणि सनी देओल हे दोन मुलं होते. त्यामुळे एका लग्न झालेल्या पुरुषासोबत आपल्या मुलीचं लग्न करुन देण्यास हेमा मालिनी यांच्या घरातल्यांचा विरोध होता. इतकंच नाही तर त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्यासाठी अभिनेता जितेंद्र यांची निवड केली होती.
धर्मेद्रविषयी हेमा मालिनी यांच्या घरी समजल्यानंतर त्यांची आई सतत हेमा मालिनी यांच्यावर लक्ष ठेवून असायची. त्यावेळी केवळ चित्रपटाच्या सेटवर हेमा आणि धर्मेंद्र यांची भेट व्हायची. या काळामध्ये जितेंद्र यांचंही हेमा मालिनींवर प्रेम होतं. त्यांनी अनेक वेळा हेमा यांना सांगायचा प्रयत्नही केला. परंतु, हेमा मालिनी यांनी जितेंद्रला स्पष्टपणे नकार दिला. मात्र त्यांच्यातील मैत्री टिकून होती. त्यांच्यातील मैत्री पाहिल्यानंतर जितेंद्र आपल्या मुलीसाठी योग्य असल्याचं हेमा मालिनी यांच्या आईला वाटलं. त्यामुळेच जितेंद्रसोबत हेमा मालिनी यांचं लग्न व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतु हेमा मालिनी यांनी घरातल्यांचा विरोध पत्करुन धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं.