मराठी साहित्यकृतींवर आधारित चित्रपट, नाटक किंवा दूरदर्शन मालिका आत्तापर्यंत होऊन गेल्या आहेत. या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीत आता ‘आधी नाटक आणि नंतर सिनेमा’ असा एक नवा प्रवाह सुरू झाला आहे. या अंतर्गत येत्या काही दिवसात ‘श्रीमंत दामोदरपंत’ आणि ‘टाइम प्लीज-गोष्ट लग्नानंतरची’ हे दोन मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित ‘खोखो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट केदार शिंदे यांच्याच ‘लोच्या झाला रे’ या नाटकावर आधारित होता. दहा ते बारा वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले हे नाटक त्या वेळी खूप गाजले होते. भरत जाधव यांची त्यात प्रमुख भूमिका होती. याच पठडीतील भरत जाधव यांचीच प्रमुख भूमिका असलेले ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक रंगभूमीवर आले होते. आता याच नाटकावर आधारित त्याच नावाचा मराठी चित्रपट तयार झाला आहे. ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’ या नाटकावर आधारित ‘बदाम राणी चौकट गुलाम’ हा चित्रपटही अलीकडेच प्रदर्शित झाला होता.
मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींवर आधारित नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका यापूर्वी येऊन गेल्या आहेत. रत्नाकर मतकरी यांच्या ‘जौळ’ या कादंबरीवर आधारित नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका झाल्या. मतकरी यांची ही कांदबरी तीनही माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली. या तीनही माध्यमांची ताकद वेगळी असून प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे या प्रत्येक माध्यमात काम करणे हे प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी आव्हान असते. नवीन आव्हान स्वीकारण्याच्या मानसिकतेमधून असे नवे प्रयोग मराठीत होत आहेत.
मराठी नाटकावर
हिंदी चित्रपट
पु.ल. देशपांडे लिखित ‘सुंदर मी होणार’ या नाटकावर आधारित ‘आज और कल’ हा हिंदी चित्रपट १९६३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुनील दत्त, अशोक कुमार, नंदा, तनुजा आदी आघाडीचे कलाकार यात होते. पण हा चित्रपट फारसा चालला नाही. या बद्दल दस्तुरखुद्द पुल म्हणाले होते की, ‘हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच चालला’
‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकावरील ‘आसू बन गए फुल’
‘आधी नाटक आणि नंतर चित्रपट’ या प्रयोगात पूर्वी येऊन गेलेले चित्रपट
*  विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकावर याच नावाचा चित्रपट
*  जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ या नाटकावर आधारित याच नावाचा चित्रपट
*  रत्नाकर मतकरी यांच्या ‘माझं काय चुकलं’ या नाटकावर आधारित ‘माझं घर माझा संसार’ हा चित्रपट
*  जयंत पवार लिखित ‘अधांतर’ या नाटकावर आधारित ‘लालबाग परळ-मुंबई झाली सोन्याची’
*  सुरेश खरे लिखित ‘कुणीतरी आहे तीथं’ या नाटकावर आधारित ‘झपाटलेल्या एका बेटावर’ हा चित्रपट
*  जयवंत दळवी यांच्या ‘पर्याय’ या नाटकावर आधारित ‘पुढचं पाऊल’ हा मराठी चित्रपट.