नुकताच बॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा ६५वा फिल्म फेअर पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा आसामची राजधानी गुवाहाटीत मोठ्या थाटामाटात पार पडला. पण पुरस्कार सोहळ्यात देण्यात आलेल्या पुरस्कारांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०च्या विकिपीडिया पेजसोबत कोणी तरी छेडछाड केली आहे. मात्र हे बदल कोणी केले आहेत हे अद्याप समोर आलेले नाही.

फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०च्या विकीपीडिया पेजवर चित्रपट आणि त्यापुढे त्या चित्रपटाने पटकावलेल्या पुरस्कारांची संख्या देण्यात आली. पण या अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स मिळवणाऱ्या ‘गली बॉय’ चित्रपटाच्या पुढे ‘पेड अवॉर्ड’ असे लिहिण्यात आले होते. याचा अर्थ गली बॉय चित्रपटाला मिळालेले सर्व अवॉर्ड्स खरेदी केले असल्याचे म्हटले जात आहे. हे बदल कोणी केले आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. पण विकिपीडिया पेजने लगेच माहिती दुरुस्ती केली आहे.

यंदाच्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये ऑस्करमधून परत आलेल्या गली बॉयने अक्षरशः धुमाकूळ घातला. तब्बल विविध श्रेणीतील १३ पुरस्कार गली बॉयने पटकावले. तर अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे पुरस्कारांवर पक्षपातीपणा करण्यात आल्याचा ठपका ठेवत नेटकऱ्यांनी #BoycottFilmFare अस्त्र उपसले. अनेक चांगले चित्रपट आणि कलाकार पुरस्कारास पात्र असताना त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात होता.

सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी #BoycottFilmFare हॅशटॅग ट्रेंड करत आपला संताप व्यक्त केला. ‘केसरी’ चित्रपटातील गाणे पुरस्कारासाठी पात्र असताना ‘अपना टाईम आयेगा’ गाण्याला पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार पक्षपाती आणि खऱ्या कलेला डावलणारा आहे. त्यामुळे फिल्मफेअर बंदी घालायला हवी,” अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली होती.