छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदा या शोचं १४ वं पर्व असून या नव्या पर्वात अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षी या शोमध्ये चर्चेत राहणारे सेलिब्रिटी सहभागी होत असतात. यावेळी देखील असेच काही चर्चिले जाणारे कलाकार सहभागी होणार आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या नावाचादेखील सहभाग असून ती लवकरच नव्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे.

सध्या शो मेकर्स अंकिता लोखंडेला ‘बिग बॉस’मध्ये घेण्याचा विचार करत असून ते लवकरच अंकिताला याविषयी विचारणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे सतत चर्चेत आहे. त्यामुळे तिचा फॅनफॉलोअर्सदेखील वाढला आहे. त्यामुळे तिच्या नावाचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.


याआधीच्या पर्वामध्ये अभिनेत्री रश्मी देसाई सहभागी झाली होती. रश्मी आणि अंकिता चांगल्या मैत्रिणी असून अंकिताने रश्मीला घराबाहेर राहून प्रचंड सपोर्ट केला होता. त्यामुळे अंकिता स्वत: या शोमध्ये सहभागी होणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, अंकिता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ती विशेष नावारुपाला आली. छोटा पडदा गाजवल्यानंतर अंकिताची पावले मोठ्या पडद्याकडे वळली असून तिने कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात झळकली होती.