सध्या हिंदी सिनेसृष्टीत दीपिका पदुकोणच्याच नावाची चर्चा सुरु आहे. ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका चर्चेत आहे. पण, दीपिकासोबतच आणखी एक नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अभिनेता विन डिझेलचे. ‘ट्रिपल एक्स’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने भारतात आलेल्या हॉलिवूडच्या या अॅक्शन स्टारसाठी बॉलिवूडविश्व आणि खुद्द दीपिकाही सज्ज झाली आहे. विन डिझेल भारत दौऱ्यावर आला असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या दोघांचे विमानतळावर अगदी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विन डिझेलसोबत या सिनेमाचा दिग्दर्शक डीजे कॅरुसोही भारतात सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना या दोघांनीही खास भारतीय पेहराव केला होता. दोघांनीही बंद गळ्याचे शर्ट त्यावर जॅकेट आणि शेरवानी घातली होती. तर दीपिकानेही सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता. सध्या विन त्याच्या सह कलाकारावर म्हणजे दीपिकावर भलताच फिदा आहे. न थांबता तो दीपिकाचे कौतुक करताना दिसतो. तो म्हणाला की, भारतामध्ये या सिनेमाचे प्रिमिअर करण्याचे मुख्य कारण म्हणजे दीपिका. ‘मी नेहमीच भारतात येण्याच्या संधीची वाट बघत होतो. हे आता फक्त दीपिकामुळेच शक्य झाले आहे. आमचा सिनेमा हा अनेक संस्कृतींना जोडणारा आहे. भारताने जे माझे स्वागत केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारतात येणे हे माझे स्वप्न होते. मला पुढे अनेक वर्ष दीपिकासोबत काम करायला आवडेल. आम्हा दोघांची वेगळीच केमिस्ट्री आहे. जेव्हा आम्ही ट्रिपल एक्सचे चित्रिकरण सुरु केले तेव्हा तिने मला एक विनंती केलेली. ती म्हणाली की, मला माझ्या देशात आपल्या सिनेमाचे मोठे प्रिमिअर करायचे आहे. आज आम्ही इथे आहोत म्हणजे आम्ही आमचं वचन पूर्ण केलं.’

डीजे कॅरुसोही त्याच्या सेरेनाबद्दल म्हणजे दीपिकाबद्दल भरभरुन बोलला. तो म्हणाला की, सेरेनाची व्यक्तिरेखा अधिक आकर्षक आणि ग्लॅमरस बनवणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होतो. यासाठी दीपिकासारखी दुसरी मिळू शकली नसती. दीपिकाचा घसा खराब झाला होता, तरीही तिने तिचे आणि विनचे नाते याबद्दल खुलासा केला. ‘आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहोत. आता या सिनेमासाठी एकत्र काम करणे हे तर आमच्या नशिबात होते. धन्यवाद विन मला तुमच्या टीममध्ये घेतल्याबद्दल. एक भारतीय म्हणून या जागतिक दर्जाच्या सिनेमात काम करायला मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.’

ती जरी विनला फार आधीपासून ओळखत असली तरी सुरुवातीला ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाने कशी भारावून गेलेली तेही दीपिकाने यावेळी सांगितले. ती म्हणाली की, ‘चार- पाच वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या ऑडिशनला मी जेव्हा गेले होते तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते. पण तेव्हा मी त्याच्याकडे फार लक्ष दिले नव्हते. कारण मला त्या सिनेमात भूमिका हवी होती त्यावर मी अधिक लक्ष केंद्रीत करत होते. पण जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी काहीच बोलू शकले नाही. मी फार काही बोललेही नाही, त्यानंतर आम्ही सिनेमाच्या चित्रिकरणाच्यावेळी भेटलो. या दोन्ही परिस्थितींमध्ये खूप फरक होता.

मी हे याआधीही बोलले आहे की, तो एक टेडी बिअरसारखा आहे. तो नेहमीच माझ्यासाठी उभा असतो. तो माझ्यासोबत असला की मला फार आरामदायक वाटते. सेरेनाही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने मला खूप आत्मविश्वास दिला.’ दीपिकाने विनला टेडी बिअर म्हटल्यानंतर लगेचच विनने प्रेक्षकांकडे वळत सगळ्यांना विचारले की, तुम्हाला मी टेडी बिअर दिसतो की एक म्हातारा बिअर?