४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) वाद दिवसागणिक चिघळत चालला आहे. एकीकडे रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ सिनेमाला कोणतीही पूर्वसूचना न देता महोत्सवातून तो वगळण्यात आल्याने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयावर राग व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे अभिनेते- दिग्दर्शक योगेश सोमण यांनी मात्र त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. ‘न्यूड’ सिनेमाला वगळण्यात आल्यामुळे इतर मराठी सिनेमेही या महोत्सवातून माघार घेतील अशा बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. पण, इतर सिनेमांच्या निर्मात्यांना याबाबत त्यांचे मत विचारलेही जात नाही. या सर्व प्रकरणात त्यांची बाजू कोणी ऐकली नाही, असे मत योगेश सोमण यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’कडे मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला पहिल्यापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचं कौतुक होतं. आपलाही एखादा सिनेमा अशा महोत्सवांत प्रदर्शित व्हावा, अशी आशा होती. अनेक वर्षांच्या मेहनतीने मी ‘माझं भिरभिर’ सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. यावर्षी माझा सिनेमा ‘इफ्फी’साठी निवडलाही गेला. आपल्या सिनेमाची इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाल्याचा आनंद मी अनुभवत असतानाच ‘न्यूड’ला या महोत्सवातून वगळल्याच्या बातम्या माझ्या कानी पडू लागल्या. आपलं सुख काहीच नाही, अशा पद्धतीने त्यांचे दुःख अंगावर आलं. यानंतर इतर निर्मात्यांनीही या सिनेमाला पाठिंबा देत महोत्सवातून माघार घेण्याचे चित्र निर्माण झाले.

ज्यांनी आतापर्यंत अनेकदा अशा महोत्सवात सहभाग घेतलाय आणि पुरस्कारही मिळवलेत, अशा व्यक्तींनी आम्हाला परस्पर ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. प्रसारमाध्यमांनी त्यांचे म्हणणे उचलूनही धरले पण मला आणि माझ्यासारख्या पहिल्यांदा अशा महोत्सवात निवडलं गेलेल्यांवर का अन्याय केला जातो, हा प्रश्न मला पडला आहे.

‘न्यूड’ हा एकच इतका मोठा सिनेमा आहे, त्याच्यासमोर इतर मराठी सिनेमे काहीच नाहीत का? महोत्सवासाठी ज्या १० सिनेमांची निवड झाली त्यातील फक्त नितीन वैद्य, राजेश म्हापूसकर आणि रवी जाधव या तीन निर्मात्यांनाच त्यांची प्रतिक्रिया विचारली जात आहे. पण बाकीच्या सहा निर्मात्यांना त्यांचे मत विचारण्याची तसदीही कोणीही घेत नाही.

मी जवळपास ३० वर्षे कलाक्षेत्रात काम करतोय. इतक्या वर्षांत मी प्रेक्षकांचं कौतुक, यश- अपयश, अनुल्लेखाने मारणे, कंपूशाही, एकटं पाडणे या सर्व गोष्टी अनुभवल्या. या सगळ्यांचा सामना करत काही मंडळी त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात. अनेक वर्षांच्या मेहनतीने आज काही पदरात पडत असताना तेही हिरावून घेण्यात येत आहे, याचा मी तीव्र विरोध करतो. इतर निर्मात्यांचे मला माहिती नाही, पण मी ‘माझं भिरभिर’ हा सिनेमा १०० टक्के महोत्सवात प्रदर्शित करणार. सुमित्रा भावे आणि उमेश कुलकर्णी गेली अनेक वर्षे महोत्सवात जातात. पण आमच्यासारख्यांची ही पहिलीच वेळ आहे. अनेकांचे आयुष्यभराचे हे स्वप्न असते. सगळ्या गोष्टींचे पालन करुन जर माझी निवड झाली असेल तर, मी का जाऊ नये? याआधी तुम्ही कधी आमच्यासाठी भांडलात का? या आधीही आमच्यावर अन्याय झाला पण तेव्हा रवी जाधव उभा राहिला का? तुमचं ते दुःख आणि आमचा आनंदही तुमच्या दुःखातच असं होत नाही, असे योगेश सोमण म्हणाले.

सिनेसृष्टीतील माझ्या एखाद्या सहकलाकारावर अन्याय झाला असेल तर त्याच्या बाजूने उभे राहिलेच पाहिजे हे मी मान्य करतो. पण मुळात ‘न्यूड’ हा सिनेमा सेन्सॉरच झालेला नाही. सिनेमा प्रदर्शित करण्याआधी १६ तारखेच्या आत त्यांना सिनेमाची सेन्सॉर कॉपी द्यायची असते हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा ‘इफ्फी’चा नियम आहे. रवी जाधव यांचा हा सिनेमा सेन्सॉरच न झाल्यामुळे आम्ही कोणत्या आधारावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला निषेध करायचा? याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महोत्सवातील ज्युरींकडून या सिनेमाची निवड करण्यात आली होती आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून याचा विरोध करण्यात आला, असे अधिकृत पत्र मिळालेले नाही. अशी कोणतीही कागदपत्रे नसताना लोकं परस्पर नावं घेत आहेत. सिनेमा महोत्सवात प्रदर्शित करण्यापूर्वी तो सेन्सॉर असावा, अशा प्रतीवर आम्हा सर्व निर्मात्यांची स्वाक्षरी घेतली जाते. या प्रतीवर रवी जाधव यांच्याकडूनही स्वाक्षरी घेतली गेली असणार, असेही त्यांनी सांगितले.

हा फार वैयक्तिक वाद होतोय असं मला वाटतं. पण मी फार पोटतिडकीने बोलत आहे. अनेक वर्षांची माझी मेहनत आहे. त्यामुळे माझं मतंही कुठे तरी समोर यायला हवं. ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन सिनेमे वगळण्यात आल्याचीच चर्चा एवढी केली जात आहे की निवड झालेल्या इतर सिनेमांकडे दुर्लक्षच केले गेले आहे. इतर नऊ दिग्दर्शक आपापले सिनेमे घेऊन महोत्सवात जात असल्याची कुठे चर्चाच नाही. या उद्विग्नतेपोटी शेवटी मी माझं मत मांडतो आहे, असे सांगून ते म्हणाले की, प्रत्येकासाठी स्वतःचं बाळ मोठं असतं. त्याप्रमाणे माझ्यासाठी ‘माझं भिरभिरं’ हे माझं मोठं बाळ आहे आणि हा सिनेमा मी ‘इफ्फी’ महोत्सवात दाखवणारच. या संदर्भात दिग्दर्शक रवी जाधव यांना त्यांची बाजू विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

-मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh soman marathi director producer actor will show his marathi movie majha bhirbhir in iffi 2017 goa film festival ravi jadhav rajesh mhapuskar nude marathi film
First published on: 15-11-2017 at 13:58 IST