15 August 2020

News Flash

लोक.. असेही आणि तसेही!

आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आपली काही मतं असतात. काहींबद्दल आपल्याला अतीव आत्मीयता वाटते,

आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आपली काही मतं असतात. काहींबद्दल आपल्याला अतीव आत्मीयता वाटते, तर काहींबद्दल तिरस्कार. या आवडण्या-नावडण्याला नेहमी काही ठोस कारणं असतात असं नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते वा आवडत नाही याबद्दल नेमकेपणाने आपण सांगू शकू असे नाही. तरीही नावडण्याची (अनेक कारणांपैकी) दोन कारणे किंवा दोन प्रवृत्ती आपण अभ्यासल्या तर या व्यक्तींचे विभाजन आपण दोन गटांत सहज करू शकू. एक गट आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्या, लुडबुड करणाऱ्या चोमडय़ा व्यक्तींचा, तर दुसरा- अति तटस्थ आणि औदासीन्याने ग्रासलेल्यांचा! थोडक्यात, आपल्या आयुष्यातील interesting व indifferent लोकांबद्दल ही चर्चा आहे.

या दोन्ही प्रवृत्ती तशा नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या. विशिष्ट स्वभाव, आचार, विचार पद्धतीने ग्रासलेल्या! आपल्याकडे कोणतेही काम हाती घेताना ‘लोक काय म्हणतील?’ याला महत्त्व दिलं जातं. बऱ्याचदा  चिंता, भीती व अनिश्चिततेने आपल्याला ही आठवण केली जाते. म्हणजे या लोकांची बोलणी ऐकून घेण्यापेक्षा कृती टाळलेली बरी, असा सल्ला यात अध्याहृत असतो. ‘लोक काय म्हणतील?’मधील हे ‘लोक’ म्हणजे आपला पहिला गट- लुडबुड करणाऱ्यांचा. या गटातील लोक ‘हे जग माझी जबाबदारी’ आणि/ किंवा ‘जगावर माझा मुक्त अधिकार’ या धारणेने वावरत असतात. म्हणजे दरवाजावर टकटक करून या असे लिहिलेलं असूनही, त्यांनी ते वाचूनही कधी अनवधानाने, तर कधी मुद्दाम थेट दार उघडून खोलीत येण्यासारखं ते वागतात. प्रत्येक व्यक्तीला आपला म्हणून एक वैचारिक, भावनिक, बौद्धिक अवकाश हवा असतो, यावर मुळी त्यांनी विचारच केलेला नसतो. किंबहुना, त्यांना ही संकल्पना भावत नाही. रुचत नाही. पटत नाही. कधी कधी तर कळतही नाही. त्यामुळे अनुभवास येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत (स्वत:शी निगडित तर नक्कीच. पण इतरांशी संबंधित अधिक!) त्यांचं म्हणणं असतंच. ते इतरांच्या संभाषणात न बोलवताही लुडबुडतात. इतरांचे विचार, निर्णय प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. इतर लोक कसे चुकताहेत, त्यांची चूक त्यांनी आपलं म्हणणं ऐकून कशी सुधारावी, हे ते पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न करतात. प्रसंगी इतरांनी त्यांचे म्हणणे न मानल्यास दुसऱ्याला अपराधी वाटेत इतकी तीव्र नाराजी व्यक्त करतात, तर कधी त्याची सक्तीही करतात. प्रत्येक गोष्टींत लुडबुड करून ते नियंत्रण गाजवतात. अशांच्या कचाटय़ात सापडलेल्या बिचाऱ्या व्यक्तींना आपला ‘अवकाश’ अनुभवण्याऐवजी गर्दीत चेंगरल्यासारखे वाटू शकते.

याउलट, दुसऱ्या गटाच्या अति तटस्थ वा बेपर्वा लोकांच्या सान्निध्यात हा ‘अवकाश’ इतका मिळतो, की एखाद्या पठारावर आपण एकटेच असहाय उभे आहोत की काय, अशी भीती वाटू लागते. ही दोन्ही टोकं घातकच! ढवळाढवळ करणाऱ्या लोकांच्या मनात काळजीपेक्षा कुतूहल अधिक आढळतं, तर अति  तटस्थांना  फारशी  पर्वाच नसते. आपल्याला लुडबुड करायला आवडत नाही, या तोंडदेखल्या बहाण्याआड ते कोणाचं कौतुक करत नाहीत, आभार मानत नाहीत, टोकाची अलिप्तता बाळगतात, स्वार्थी वागतात. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य व आत्मनिर्भरता इतकी महत्त्वाची वाटते की इतरांकडे छोटी मदत मागणेसुद्धा त्यांच्या अहंकारावर घाला आहे असे  ते मानतात. त्यामुळे ते कोणाच्या अध्यात ना मध्यात अशी बघ्याची भूमिका घेतात. अनभिज्ञता  दर्शवतात. संभाषणात आपणहून क्वचितच पुढाकार घेतात. परस्परावलंबन गौण मानतात. आप्तेष्टांच्या  स्वास्थ्याची काळजी नसल्यामुळे त्यांची चौकशी करणे तर दूरच! हा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू असू शकतो, हे जरी खरे असले तरीही या स्वभावाचा आव आणून दांभिकपणे वागणारेही असतात. म्हणजे तटस्थतेच्या  मुखवटय़ाआड असतो असा चेहरा- ज्याला इतरांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते; पण ते आपली ही गरज उघड करणे कमीपणाचे मानतात. त्यामुळे आपला वृथा अहंकार, आडमुठेपणा, हुकूमशाही आणि स्वार्थीपणा जपण्यासाठी ते ‘आम्ही इतरांना वागण्या-बोलण्याची मुभा देतो, त्यांच्या जीवनात लुडबुड करत नाही, इतरांचा अवकाश व स्वातंत्र्याचा मान राखतो’ अशी खोटी विधाने आणि भूमिकांवर विसंबतात. अशा दांभिक तटस्थांचा सहवास जास्त धोकादायक. कारण त्यांच्या मूळ स्वभावात, हेतूमध्ये आणि दर्शवल्या/भासवल्या जाणाऱ्या भूमिकेत फरक दिसतो. पण या व्यक्तींची दांभिकता ओळखणे तसे  सोपे असते, कारण ते  संपर्कातील सगळ्या व्यक्तींशी एकसमान किंवा सुसूत्र व्यवहार करत नाहीत. ते ग्रह करून घेतलेल्या/ अढी धरलेल्या व्यक्तींप्रति हा दांभिक तटस्थ व्यवहार करत असतात.

गट कोणताही असो; पण या लोकांशी व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, आचरणात आणाव्यात, त्यागाव्यात आणि बदलाव्यात, ते पाहू.

प्रथम ही गोष्ट स्वीकारावी आणि अखंड स्मरणात ठेवावी, की या दोन्ही गटांच्या व्यक्तींशी संबंध म्हणजे आपल्यातल्या ऊर्जेची, सहनशीलता व सोशिकतेची सत्त्वपरीक्षा आहे. या परीक्षेला काळ-वेळ, कालावधी नाही. पण पेपर पॅटर्न मात्र ठरलेला! हा तोचतोपणा कंटाळवाणा होऊन बसतो, चीड निर्माण करू शकतो,  आपल्याला हताश करू शकतो. हा स्वभावपैलू त्यांच्या व्यक्तित्त्वाचाच भाग बनला असेल तर आपल्या स्वभावातील भावनिक उबेने तो वितळणे कठीण. अशा व्यक्तींच्या स्वभावपरिवर्तनाचा मानस बाळगून आपण त्याकरता काही कृती केली तरी आपले आत्मबळ आणि ऊर्जा संरक्षित राहील याकडेही लक्ष द्यावे. दुसऱ्या प्रक्रियेत अधिक लाभ आहे- आणि यशही!

आपल्या आयुष्यात लुडबुड करणाऱ्या व्यक्तींच्या त्रासदायक वर्तनामुळे, बोलण्यामुळे आपण त्यांच्या मूळ हेतूकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. कधी कधी अनवधानाने हे होते. त्यांची लुडबुड आपल्याला इतकी तीव्रतेने जाणवते, की आपण बौद्धिक व भावनिकदृष्टय़ा त्यांच्या हेतूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धजावत नाही. आपल्याला तशी इच्छाही होत नाही. पण काही प्रसंगी, जेव्हा जमेल तेव्हा किंवा ठरवून त्यांचा हेतू पडताळण्याचा प्रयत्न करावा. त्या व्यक्तीशी असलेल्या आपल्या नात्याचे स्वरूप व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हे करावे. त्या व्यक्तीचा हेतू निखळ असल्यास तिचे अनुभवसंचित लक्षात घेऊन आपल्याला पटेल, रुचेल, रास्त वाटेल ते आपण आत्मसात करावे. आपल्या विशिष्ट वागण्या/ बोलण्याने आपण या व्यक्तींना ढवळढवळ करण्यास प्रोत्साहित करत आहोत का, हेही पाहावे. उदा. आपण आजवर ही ढवळाढवळ अवाजवी प्रमाणात सहन करत आलो आहोत का? नात्यातील मर्यादा धूसर ठेवल्या गेल्या आहेत का? आपला आत्मविश्वास दोलायमान आहे असे भासवले गेले आहे का? जीवनातील सद्य: किंवा गतपरिस्थिती अवाजवीरीत्या दडवल्या आहेत वा अयोग्यरीत्या, अपूर्णतेने समोर आणल्या आहे का? प्रस्तुत केल्या आहेत का? इ. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. विनम्र स्पष्टवक्तेपणाने वा नियंत्रित देहबोलीतूनही आपण या लुडबुडीचा निषेध करू शकतो. या दोन्ही प्रकारच्या संवादांमध्ये तीव्रतेची एकसूत्रता बाळगावी- म्हणजे समतोल राखून शब्द व देहबोली दर्शवावी. अशा प्रयत्नांनंतरही लुडबुड कायम राहील, हा संभवही नाकारता येणे कठीणच. त्यामुळे आपल्या आत्मिक ऊर्जेची व अमूल्य वेळेची निगा राखावी. स्वसंरक्षण करावे. त्यांच्या धोरणात काही अंशी बदल दिसला/ भासला तरीही जुन्या आचार-विचारांकडे या व्यक्ती झेपावू शकतात. त्यामुळे ‘लगे रहो’ ही नीती आपण आपल्या प्रयत्नांत अवलंबलेली बरी!

आता दुसरा गट! अति तटस्थ व्यक्तींचा. ही तटस्थता त्या व्यक्तीचं मूळ व्यक्तिमत्त्व, स्वभाव, मानसिकतेचा पैलू आहे की चढवलेला मुखवटा, हे ओळखावे. त्यानुसार आपली भूमिका ठरवणे गरजेचे आहे. तो व्यक्तित्त्वाचा भाग असल्यास त्याची संभाव्य कारणं गतायुष्यातील घडामोडींत असू शकतात. यात त्या व्यक्तीला दोष देणे टाळावे व तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांचा आपल्याला अपेक्षित असलेला सहभाग न लाभल्यास निश्चित वाईट वाटू शकतं, एकटं वाटू शकतं. अशांचा सहभाग व सहवास मिळवण्याचा प्रयत्न करावा; परंतु आपली मन:स्थिती, बळ, स्थैर्य व आनंद त्यांच्यावर अवलंबून ठेवणे टाळावे. आपल्या आत्मोन्नतीत या लोंबकळण्याने बाधा येऊ देऊ नये. कटू अनुभवांमुळे बनलेल्या अशा व्यक्तिमत्त्व पैलूकडे प्रगल्भतेच्या चष्म्यातून पाहावे. त्या व्यक्तीस वेळ द्यावा, साथ द्यावी. पण त्याचवेळी आपले स्वत्व ढळू देऊ नये. कारण इतरांचा सहभाग असो वा नसो, आपला आपल्या आयुष्यातील  सजग  सहवास खूप मौलिक व महत्त्वाचा असतो.

आता वळूया मुखवटा धारण केलेल्या दांभिक तटस्थांकडे. या व्यक्तींशी दैनंदिन व्यवहार करताना आपण जाणीवपूर्वक संवेदना पडताळल्यास अशांचा दांभिकपणा सहज लक्षात येईल. परंतु अशांशी थेट चर्चा करण्यात पंचाईत असते, कारण ते कसलाही पुरावा मागे सोडत नाहीत. त्यामुळे त्यांचा पर्दाफाश वगैरे करण्यात वेळ फुकट घालवण्यात अर्थ नाही. त्यांच्या वागण्याचे निरीक्षण करून आपल्याला अशी एकाकी बेटाची मानसिकता जोपासायची नाही, हा धडा गिरवावा. या व्यक्ती आपली कथित तटस्थता राखण्यासाठी स्वत:च्या आयुष्यातल्या अनेक बाबी आपल्यापासून दडवून ठेवतात. त्यांच्या वागण्या/ बोलण्यात/ धोरणात/ भूमिकेत ‘ँ्रीिल्ल ंॠील्लिं’ असतो. त्यांची  ही कार्यपद्धती समजली आणि आपला स्वभाव तसा नसल्यास त्याचा आपल्याला त्रास होईल, वाईट वाटेल, आपण विचलित होऊ. अशावेळी स्वत:ला सावरावे आणि त्यांचे हे वागणे ही आपल्याला मिळालेली मुभा समजावी. मुभा- आपल्या आयुष्यात आपल्याला हव्या त्याच गोष्टी प्रस्तुत करण्याची! हा स्वार्थीपणा खोटे बोलणे न समजता आपली मानसिकता ढळू न देण्याचा उपाय आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

थोडक्यात- interference आणि indifference या दोन्ही टोकांकडे जाण्यापेक्षा मध्यावर- म्हणजे involvement वर भर द्यावा. नात्यात पारदर्शकता आणि निखळ हेतू असल्यास/ ठेवल्यास आपण हा सुवर्णमध्य गाठू शकू.

डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2016 5:08 am

Web Title: article on interesting and indifferent people
Next Stories
1 प्रेम
2 ग्रह (आभाळातले नव्हे!)
3 झूठ बोले..
Just Now!
X